पुणे : पुणे शहरातील बंडगार्डन पोलिसांनी एक महत्त्वाची कारवाई करत सराईत चोरट्याला अटक केली असून, त्याच्याकडून मोबाईल फोन आणि दुचाकी असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बंडगार्डन पोलिस स्टेशनच्या दक्ष तपास पथकाने केली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शिंदे वाहनतळाजवळून कात्रज बसस्टॉपकडे चालत जात असताना, दुचाकीवरील दोन अनोळखी व्यक्तींनी जबरीने मोबाईल हिसकावून नेला. या प्रकरणी गु.र.नं. ३२९/२०२५ भा.दं.वि. कलम ३०४(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, पोलिस पथक गस्त घालत असताना, फिर्यादीने दिलेल्या वर्णनाशी साधर्म्य असलेला इसम विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून जाताना आढळला. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आणि चौकशीदरम्यान त्याने बंडगार्डन, स्वारगेट आणि राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली.
आरोपीचे नाव अर्जुन हिराजी भोसले (वय २३, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) असे असून त्याच्यावर पुणे शहरात एकूण ९ गुन्हे नोंद असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाईल फोन आणि एक दुचाकी हस्तगत केली आहे.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे. या संपूर्ण कारवाईत अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री. राजेंद्र बनसोडे, उप-आयुक्त परिमंडळ २ श्री. मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त (लष्कर विभाग) सौ. संगिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे आणि निरीक्षक (गुन्हे) श्री. निलकंठ जगताप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सहभाग घेतला.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, गणेश चव्हाण, मोहन काळे तसेच अंमलदार प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड, बाळासाहेब भांगरे आणि तुकाराम हिवाळे यांनी मोलाचे योगदान दिले. या कारवाईमुळे शहरात वाढत्या जबरी चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.