Home Breaking News पुण्यात अंमली पदार्थांवर मोठी कारवाई : खराडी परिसरातून २७ ग्रॅम एमडी जप्त,...

पुण्यात अंमली पदार्थांवर मोठी कारवाई : खराडी परिसरातून २७ ग्रॅम एमडी जप्त, दोन जणांना अटक; १२.४१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

41
0
पुणे : पुणे शहरात अंमली पदार्थांविरोधात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत खराडी परिसरातून मेफेड्रॉन (एम.डी.) या घातक अमली पदार्थासह दोन आरोपींना रंगेहात अटक केली आहे. पहाटेच्या सुमारास केलेल्या या कारवाईत तब्बल १२ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुणे पोलिसांनी ड्रग्ज माफियांवर मोठा आघात केला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक २ चे अधिकारी दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे शहरात गस्त घालत असताना खराडी पोलीस स्टेशन हद्दीत संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने खराडी येथील ईऑन आयटी पार्क फेज २ च्या मागील गेटजवळ सापळा रचला. पहाटे ५.२८ वाजण्याच्या सुमारास दोन इसम संशयास्पद स्थितीत उभे असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात २७ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ आढळून आला. प्राथमिक चौकशीत हा पदार्थ विक्रीसाठी बेकायदेशीररित्या साठवून ठेवला असल्याचे स्पष्ट झाले. जप्त केलेल्या एमडीची बाजारभावानुसार किंमत सुमारे १२,४१,००० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित (वय २८) व हरीष सुजनाराम देवासी (वय २२) अशी आहेत. दोघेही मूळचे राजस्थान येथील असून सध्या वाघोली परिसरात वास्तव्यास होते. हे आरोपी पुण्यातील तरुणांमध्ये एमडीची विक्री करून जाळे विस्तारण्याच्या तयारीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.
सदर प्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २१(ब), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी केली जात असून ड्रग्ज पुरवठा साखळीचा माग काढण्याचे काम सुरू आहे.
पुणे शहरात आयटी पार्क परिसर, विद्यार्थी व कामगार वसाहतींमध्ये अंमली पदार्थांची मागणी वाढत असल्याने पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनीही संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक व खराडी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या पार पाडली. पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, शहरात ड्रग्जविरोधी कारवाया आणखी तीव्र करण्यात येणार असून कोणालाही कायद्याच्या कचाट्यातून सुटका मिळणार नाही.