Home Breaking News उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपचा प्रचार शिगेला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेला...

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपचा प्रचार शिगेला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य जाहीर सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित केले. या सभेमुळे उल्हासनगरमध्ये भाजपच्या प्रचाराला नवे बळ मिळाले असून, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजांवर प्राधान्याने काम करण्याचा भाजपचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले. “महापालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास वेगाने घडवायचा असेल, तर सक्षम नेतृत्व आणि प्रामाणिक कारभार आवश्यक आहे, आणि हे केवळ भाजपच देऊ शकते,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी, आमदार किसन कथोरे, आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व नेत्यांनी एकत्रितपणे भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विकासाची नवी दिशा मिळाली आहे. त्याच धर्तीवर उल्हासनगर शहरालाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजपला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
या जाहीर सभेत स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या अपेक्षा आणि भविष्यातील विकास आराखडा यावर भर देण्यात आला. उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरली असून, ही निवडणूक शहराच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचे नेत्यांनी सांगितले.
📍 स्थळ : उल्हासनगर
🕟 वेळ : सायंकाळी ५.४० वा.
📅 दिनांक : ७ जानेवारी २०२६