Home Breaking News पुण्यात खंडणीविरोधी पथकाची मोठी कारवाई; सराईत गुन्हेगारांकडून ४ गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतुसे...

पुण्यात खंडणीविरोधी पथकाची मोठी कारवाई; सराईत गुन्हेगारांकडून ४ गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतुसे जप्त

37
0
पुणे : शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पुणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक–२ ने धडाकेबाज कारवाई करत दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेत देशी बनावटीची ४ पिस्तुले आणि ५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले असून शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही मोठी यशस्वी मोहीम ठरली आहे.
मा. वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पथक शहरात गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग, फरारी आरोपींचा शोध आणि गुप्त माहिती संकलनाचे काम करत होते. याच दरम्यान पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे आणि प्रशांत शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील आरोपी रोहित दुर्गेश धर्माधिकारी हा शिवाजीनगर येथील ज्ञानेश्वर पादुका चौक परिसरात येणार असून त्याच्याकडे अग्निशस्त्र आहे.
ही माहिती मिळताच वरिष्ठांना कळवून पथकाने तत्काळ सापळा रचला. पोलिसांनी परिसरात दक्षता वाढवत संशयितांवर नजर ठेवली. काही वेळातच दोन संशयित इसम तेथे आढळून आले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून ४ लोखंडी धातूची गावठी बनावटीची सिल्व्हर रंगाची मॅगझीनसह पिस्तुले आणि ५ जिवंत काडतुसे (KF 7.65) असा एकूण १ लाख ६४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताब्यात घेतलेल्यांची नावे
१) रोहित दुर्गेश धर्माधिकारी (वय २४, रा. जुनी सांगवी)
२) अभिषेक राजू टेंकल (वय २३, रा. शिवाजीनगर)
दोघांवर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असून ते सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक तपासात हे शस्त्र बाळगण्यामागे खंडणी किंवा इतर गंभीर गुन्ह्याचा कट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपास सुरू असून शस्त्रे कोठून आणली, कोणाला पुरवठा होणार होता याचा शोध घेतला जात आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सह पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत तत्परतेने ही मोहीम राबवली.
शहरातील गुन्हेगारीवर कठोर कारवाई करत बेकायदेशीर शस्त्रसाठ्याविरोधात पोलीस प्रशासनाने ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांनीही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पुणेकरांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून गुन्हेगारीविरोधात पोलिसांची सजगता पुन्हा अधोरेखित झाली आहे.