Home Breaking News शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना नमन; कामगार हक्क आणि स्वाभिमानाचा वारसा अधोरेखित

शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना नमन; कामगार हक्क आणि स्वाभिमानाचा वारसा अधोरेखित

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज मुंबईतील द सेंट रेजिस हॉटेलमध्ये भारतीय कामगार सेनेच्या वतीने भावपूर्ण अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा, कार्याचा आणि कामगार हितासाठीच्या संघर्षाचा गौरव करत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला नवनिर्वाचित नगरसेवक श्री. निशिकांत शिंदे, भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस श्री. दिलीप जाधव, युनिट अध्यक्ष श्री. विवेक करलकर, हॉटेल व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकारी, तसेच भारतीय कामगार सेनेची संपूर्ण कार्यकारिणी आणि मोठ्या संख्येने कामगार बांधव उपस्थित होते. उपस्थितांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी बोलताना खासदार अरविंद सावंत यांनी बाळासाहेब ठाकरे हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर मराठी माणसाचा आवाज, कामगारांचा कणखर आधार आणि स्वाभिमानाचे प्रतीक होते, असे सांगितले. “भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांनी कामगारांना न्याय, हक्क आणि सन्मान मिळवून दिला. त्यांच्या विचारांची मशाल पुढे नेण्याची जबाबदारी आज आपल्यावर आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात श्रीमान बाळासाहेबांच्या कामगार चळवळीतील योगदानावर प्रकाश टाकण्यात आला, तसेच आजच्या बदलत्या औद्योगिक वातावरणात कामगार हक्क अधिक मजबूत करण्यासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभर विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक उपक्रम राबविण्याचे संकेतही यावेळी देण्यात आले. हा अभिवादन सोहळा म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना नवे बळ देणारा आणि पुढील पिढीला प्रेरणा देणारा क्षण ठरला.