रामटेक : महाराष्ट्र–जपान संबंधांना नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण बैठक आज रामटेक निवासस्थानी पार पडली. जपानमधील सागा प्रांताचे गव्हर्नर यामागुची योशिनोरी आणि त्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने पंकजा ताईंची सदिच्छा भेट घेत राज्यातील पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्ती, नदी पुनरुज्जीवन, शिक्षण आणि विविध औद्योगिक क्षेत्रांतील सहकार्याबाबत सखोल चर्चा केली.
या भेटीत पंकजा ताईंनी महाराष्ट्र शासनाच्या ‘स्वच्छ जलस्रोत’ आणि ‘नदी पुनरुज्जीवन’ या धोरणात्मक उपक्रमांवर भर देत जपानचे तांत्रिक आणि व्यवस्थापन कौशल्य राज्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. नद्या, तलाव आणि समुद्रकिनारे प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी दोन्ही देशांनी संयुक्त कृती आराखडा तयार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किमीपेक्षा अधिक समुद्रकिनाऱ्यामुळे समुद्रातून येणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याचबरोबर नद्यांमधील रासायनिक आणि औद्योगिक प्रदूषणामुळे पर्यावरणीय समतोल धोक्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर तंत्रज्ञान, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि आधुनिक जलशुद्धीकरण प्रणाली यांसाठी जपानकडून सहकार्य घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
गव्हर्नर यामागुची यांनी सागा प्रांतातील कचरा व्यवस्थापन आणि नदी स्वच्छता प्रकल्पांचे यशस्वी मॉडेल सादर करत महाराष्ट्रासोबत तांत्रिक ज्ञान, संशोधन क्षमता आणि प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक करण्याची तयारी दर्शवली. दोन्ही बाजूंनी पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, तसेच शाश्वत विकास प्रकल्पांमध्ये गुंतवणूक वाढवण्यावरही भर देण्यात आला.
पर्यावरणासोबतच शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी देवाणघेवाण कार्यक्रम, पशुसंवर्धन क्षेत्रातील आधुनिक पद्धती, तसेच सौंदर्यप्रसाधन आणि लघुउद्योग क्षेत्रात संयुक्त उपक्रम राबविण्याबाबतही चर्चा झाली. या सहकार्यामुळे स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
बैठकीत जपानच्या शिष्टमंडळात प्रादेशिक देवाणघेवाण विभागाचे उपमहासंचालक मसाहिरो ओनो, आंतरराष्ट्रीय धोरण गटाचे उपसंचालक कोजी योशिताके, प्रकल्प प्रमुख कोकी कनामारू, जेट्रो सागाचे मुख्य संचालक हिरोशी योनेयामा उपस्थित होते. तसेच पर्यावरण सचिव जयश्री भोज, पशुसंवर्धन सचिव रामास्वामी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव देवेंद्र सिंह यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ही बैठक भारत–जपान सहकार्याला नवे परिमाण देणारी ठरत असून पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाच्या दिशेने महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. पंकजा ताईंच्या पुढाकारामुळे राज्यात हरित विकासाच्या नव्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.