Home Breaking News वकील वर्गाच्या सर्वांगीण कल्याणासाठी स्वतंत्र कमिटी कार्यरत – ॲड. सचिन पानी यांची...

वकील वर्गाच्या सर्वांगीण कल्याणासाठी स्वतंत्र कमिटी कार्यरत – ॲड. सचिन पानी यांची ग्वाही

41
0
पिंपरी–चिंचवड :
वकिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, त्यांच्या व्यावसायिक अडचणी तसेच सामाजिक व कल्याणकारी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी “अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ॲडव्होकेट बार असोसिएशन, पिंपरी चिंचवड” या नव्या वकील संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून वकील वर्गाच्या हितासाठी स्वतंत्र कमिटी कार्य करणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सचिन पानी यांनी दिली.
पिंपरी–मोरवाडी न्यायालय परिसरातील बार रूममध्ये या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. अरूण खरात होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. राकेश अकोले, बी. के. कांबळे, प्रकाश निनाळे, रमेश गालफाडे, केशव घोगरे, प्रमिला गाडे आदी ज्येष्ठ वकील उपस्थित होते.
“संघटना सर्व वकिलांसाठी कार्य करेल”
याप्रसंगी बोलताना ॲड. सचिन पानी म्हणाले की, वकील हा न्यायव्यवस्थेचा कणा असून त्यांच्या समस्या वेळेत सोडवणे, त्यांना आवश्यक सुविधा मिळवून देणे आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी योजना राबवणे हे या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ही संघटना कोणत्याही गटासाठी नव्हे, तर सर्व वकिलांसाठी कार्य करेल, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.
नवीन कार्यकारिणीची घोषणा
या कार्यक्रमात संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
  • महिला सहसचिव : ॲड. संगीता कुशालकर
  • सहसचिव : ॲड. संजय माने
  • सहायक सहसचिव : ॲड. सुनील डोंगरे
  • प्रसिद्धी प्रमुख : ॲड. तेजस सरतापे
तसेच उपाध्यक्ष, सचिव, महिला सचिव, सहसचिव, हिशोबनीस, खजिनदार व कार्यकारिणी सदस्य अशा विविध पदांवर निवड झालेल्या वकिलांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
बार आणि बेंच यांच्यात सुसंवाद महत्त्वाचा
ॲड. समीर चव्हाण यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, बार आणि बेंच यांच्यातील संबंध अधिक दृढ करणे ही काळाची गरज आहे. न्यायप्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी सर्व वकिलांनी एकत्र येणे आवश्यक आहे.
कार्यक्रमात ॲड. अरूण खरात यांनी नवीन कार्यकारिणीस पाठिंबा देत शुभेच्छा दिल्या. ॲड. पी. एस. कांबळे आणि ॲड. सुनील कडूसकर यांनीही संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. सूत्रसंचालन ॲड. तेजस चवरे व ॲड. प्रशांत बचुटे यांनी केले.
ही नवी संघटना भविष्यात वकिलांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम, प्रशिक्षण, आरोग्य सुविधा, कायदेशीर मदत आणि सामाजिक उपक्रम राबवणार असल्याने वकील वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.