पुणे : शहरातील दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यातील मागील एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अखेर बंडगार्डन पोलिसांनी अटक करून मोठे यश मिळवले आहे. गुप्त माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या नियोजनबद्ध कारवाईत मालधक्का चौक परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात घडलेल्या दरोड्यांच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे यांच्या आदेशानुसार तपास पथक गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर गायकवाड यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दरोड्याच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी मुनवर ऊर्फ मुनीर शेख (वय ३९) हा मालधक्का चौकाजवळ थांबलेला आहे. ही माहिती खात्रीशीर असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचला.
तपास पथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपीला वेढा घालून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याची ओळख पटविण्यात आली. आरोपी हा कोंढवा येथील मिठानगर परिसरात भाड्याने राहत असल्याचे समोर आले. त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु.र.नं. ५२/२०२५ मधील दरोडा आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय, दुसऱ्या एका गुन्ह्यातील ४० हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केला. या जप्तीमुळे चोरीच्या मालाचा उलगडा होण्याची शक्यता असून आणखी गुन्ह्यांशी आरोपीचा संबंध तपासला जात आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी गेल्या वर्षभरापासून फरार होता. तो वारंवार आपले ठिकाण बदलून पोलिसांची दिशाभूल करत होता. मात्र गुप्त माहिती आणि सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर पोलिसांनी त्याला जेरबंद केले. या अटकेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती संगीता शिंदे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता व त्यांच्या पथकाने बजावली. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलीसांना माहिती द्यावी, जेणेकरून गुन्हेगारीवर आळा घालता येईल.