नागपूर : राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये दीर्घकाळापासून जाणवत असलेली मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी आकृतीबंधानुसार पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत केली. वित्त विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधानपरिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी कृषी विद्यापीठांतील मनुष्यबळाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेला उत्तर देताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी विद्यापीठांमधील शिक्षक, संशोधक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यावर होणाऱ्या परिणामाची दखल घेतली. चर्चेदरम्यान सदस्य अमोल मिटकरी आणि सदाभाऊ खोत यांनीही आपली मते मांडत तातडीने भरतीची आवश्यकता अधोरेखित केली.
मंत्री भरणे यांनी सांगितले की, सेवाप्रवेश मंडळाचा तात्पुरता कार्यभार उपाध्यक्ष (एमसीआरसी) यांना तत्काळ सोपविण्यात येणार असून, त्यामुळे पदोन्नतीसंबंधीच्या प्रलंबित प्रक्रिया अधिक वेगाने आणि पारदर्शकपणे पूर्ण करता येणार आहेत. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील अस्वस्थता दूर होऊन कार्यक्षमतेत वाढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कृषी विद्यापीठे ही राज्याच्या शेती विकासाची मेरुदंड असल्याने, येथे पुरेसे आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. या निर्णयामुळे संशोधन, नवतंत्रज्ञानाचा प्रसार आणि शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान पोहोचविण्याची प्रक्रिया अधिक मजबूत होणार असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. पुढील अधिवेशनात हा विषय पुन्हा उपस्थित करण्याची गरज भासणार नाही, असा विश्वास कृषी मंत्र्यांनी सभागृहाला दिला.