चिखली | प्रतिनिधी :-महाराष्ट्रातील पहिले जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ, चिखली येथे आयोजित बालकिर्तन महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाला. या महोत्सवाने केवळ धार्मिक परंपरेचा वारसा जपला नाही, तर नव्या पिढीला संतविचार, संस्कार आणि अध्यात्माशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
या बालकिर्तन महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच संत परंपरा, अभंग, कीर्तनशास्त्र आणि समाजप्रबोधनाचे धडे इंग्रजी माध्यमातूनही दिले जात आहेत. त्यामुळे आधुनिक शिक्षण घेत असतानाच संत साहित्य आणि भारतीय सांस्कृतिक मूल्ये आत्मसात करण्याची अनोखी संधी मुलांना मिळत आहे. लहान वयातील कीर्तनकारांनी सादर केलेल्या कीर्तनाविष्काराने उपस्थितांच्या मनावर गारुड केले.
बालकिर्तनकारांच्या सादरीकरणातून अभंगांची गोडी, ताल-लय, भाव-भक्ती आणि देहबोली यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. “कीर्तन चांगं, कीर्तन चांगं… प्रेमाच्या ओळी नाचल्या, हरपले देहभान” अशा संतवचनांचा अनुभव प्रत्यक्ष साकारताना पाहून आयोजक, पालक आणि रसिक समाधानाने भारावून गेले. संतपीठाने घेतलेला संकल्प यशस्वीपणे पूर्ण झाल्याची भावना सर्वांमध्ये व्यक्त होत होती.
या महोत्सवाला कोणत्याही राजकीय निवडणुकांची पार्श्वभूमी असो वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत, बालकिर्तन महोत्सव हा सातत्याने सुरू राहणारा लोकसांस्कृतिक उपक्रम ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. संतपीठ प्रशासन, शिक्षक, संचालक, मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे या उपक्रमासाठी घेतलेले परिश्रम विशेष कौतुकास्पद असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
या उपक्रमामुळे भावी पिढीमध्ये भक्ती, संस्कार, शिस्त आणि समाजाबद्दलची जाणीव निर्माण होत असून, संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी हा महोत्सव प्रेरणादायी ठरत आहे.