पुणे : जीत आणि दिवा या दांपत्याने त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा पहिला वाढदिवस अतिशय वेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा करत समाजासमोर सेवाभावाचे आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. आजच्या दिवशीच गेल्या वर्षी त्यांनी संसारासोबत समाजसेवेचा संकल्प करत ‘मंगल सेवा’ हा उपक्रम सुरू केला होता, ज्याअंतर्गत दरवर्षी ५०० नवविवाहित दिव्यांग बहिणींना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे व्रत त्यांनी घेतले आहे.
या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना नवसंजीवनी मिळाली असून आर्थिक अडचणींमुळे थांबलेली स्वप्ने पुन्हा उभी राहिली आहेत. विवाहानंतर नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या दिव्यांग महिलांना या मदतीमुळे सन्मानाने जगण्याचा आत्मविश्वास मिळत आहे. केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेनेही विविध मार्गदर्शन आणि सहाय्य देण्याचे काम या उपक्रमातून केले जात आहे.
कुटुंबियांनी सांगितले की, “सेवेचा हा मार्ग निवडताना जीत आणि दिवाने स्वतःच्या आनंदासोबत समाजातील गरजूंचा विचार केला. आज त्यांच्या प्रयत्नांमुळे शेकडो घरांमध्ये आनंद, आशा आणि आत्मसन्मान परतला आहे.”
एका वडिलांच्या नात्याने त्यांनी व्यक्त केलेल्या भावना अत्यंत हृदयस्पर्शी आहेत. “मुलं स्वतःच्या आनंदात समाजालाही सामावून घेत आहेत, यापेक्षा मोठं समाधान कोणतं असू शकत नाही. एखाद्या मुलीच्या चेहऱ्यावर परतलेली स्मितरेषा हीच आमच्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे,” असे त्यांनी नमूद केले.
समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. अनेकांनी या दांपत्याचे कौतुक करत त्यांच्या सेवाभावी कार्याला सलाम केला आहे. जीत आणि दिवा यांचा हा सेवाप्रवास पुढील काळात आणखी विस्तारावा आणि अधिकाधिक कुटुंबांच्या आयुष्यात आनंद व सन्मानाची नवी पहाट घडवावी, अशी सर्वांकडून प्रार्थना व्यक्त होत आहे.