पुणे : शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत मुंढवा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. बी. टी. कवडे रोड, घोरपडी परिसरात दुकानांची तोडफोड करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या आरोपींना मुंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अल्पावधीत अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९.५० वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी लोखंडी हत्यारांच्या सहाय्याने परिसरातील काही दुकानांवर हल्ला चढवला. दुकानांच्या काचा फोडणे, साहित्याची नासधूस करणे आणि स्थानिकांना धमकावणे अशा प्रकारांनी त्यांनी परिसरात दहशत निर्माण केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक २७/२०२६ नोंदवून भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विशेष तपास पथक तयार करण्यात आले.
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. राजरत्न कुलदीप खरे (वय २०, रा. भिमनगर, मुंढवा) याला अटक करण्यात आली असून त्याचे इतर तीन साथीदार विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याचे समोर आले आहे. सर्वांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपींकडून परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि स्थानिकांना धमकावण्यासाठी हा प्रकार केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण करत असून आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या अधिपत्याखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहा. पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांच्यासह संपूर्ण पथकाने अत्यंत दक्षता आणि वेगाने ही मोहीम राबवली. या कारवाईमुळे परिसरातील व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून पोलिसांच्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये पुन्हा सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.