Home Breaking News पुण्यात ‘दृश्यम ३’ फिल्मीस्टाईल खुनाचा उलगडा! वारजे पोलिसांनी उघडकीस आणली धक्कादायक कहाणी

पुण्यात ‘दृश्यम ३’ फिल्मीस्टाईल खुनाचा उलगडा! वारजे पोलिसांनी उघडकीस आणली धक्कादायक कहाणी

46
0
पुणे : पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलिसांनी अत्यंत गुंतागुंतीच्या आणि फिल्मी पद्धतीने केलेल्या खुनाचा उलगडा केला आहे. हा खून “दृश्यम ३” सिनेमाच्या कथानकासारखा असल्याने संपूर्ण पुण्यात या घटनेची चर्चा रंगली आहे. आरोपी दुसरा कोणी नसून मृत महिलेचा पतीच आहे, ज्याने आपल्या पत्नीवर संशय आल्यामुळे थरारक पद्धतीने तिचा खून केला.
दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात एक महिला बेपत्ता असल्याची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदाराने सांगितले की त्याची पत्नी श्रीराम मिसळ हाऊस, गोगलवाडी फाटा, मुंबई-बेंगळुरू हायवे, शिंदेवाडी येथून बेपत्ता झाली आहे. या तक्रारीवरून मिसिंगची चौकशी राजगड पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली होती.
मात्र, या प्रकरणात पोलिसांना तक्रारदाराच्या वर्तणुकीत संशयास्पद हालचाली जाणवल्या. वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे आणि नितीन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तपास पुढे सुरू ठेवण्यात आला. तपासादरम्यान आरोपी पतीला चौकशीसाठी बोलावण्यात आले. अखेर पोलिसांच्या कसून चौकशीत त्याने सत्य कबूल केले — पत्नीवर संशय आल्यामुळे रागाच्या भरात तिला ठार मारल्याची कबुली दिली!
या प्रकरणी आरोपीचे नाव समीर पंजाबराव जाधव (वय ४२, रा. शिवणे, पुणे) असे असून त्याच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ००/२०२५, भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास राजगड पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे, निलेश बडाख, तसेच पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, नितीन गायकवाड, आणि पोलीस अंमलदार गणेश कर्चे, सुनिल मुठे, योगेश वाघ, शरद पोळ व शिरीष गावडे यांनी मोलाची भूमिका बजावली. या फिल्मी खुनामुळे वारजे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांनी पोलिसांच्या तत्पर तपासाचे कौतुक केले आहे. पोलिसांच्या हुशारीमुळे एक गुंतागुंतीचा खून प्रकरण उघडकीस येऊन सत्य समोर आले आहे.