Home Breaking News महाशिवरात्रीतही भीमाशंकर मंदिर राहणार बंद; कुंभमेळा २०२७ पार्श्वभूमीवर विकासकामांना वेग, भाविकांच्या सुरक्षेला...

महाशिवरात्रीतही भीमाशंकर मंदिर राहणार बंद; कुंभमेळा २०२७ पार्श्वभूमीवर विकासकामांना वेग, भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

4
0
पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराबाबत भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या व्यापक विकासकामांमुळे यंदा महाशिवरात्रीच्या काळातही मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी याबाबत अधिकृत घोषणा करत दि. १२ फेब्रुवारी २०२६ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मंदिर नित्यदर्शनासाठी बंद राहील, असे स्पष्ट केले आहे.
नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान लाखो भाविक त्र्यंबकेश्वरसोबत भीमाशंकर येथेही दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. दररोज सुमारे एक लाखांहून अधिक भाविक येथे येऊ शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ‘श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा (कुंभमेळा २०२७ – गर्दी व्यवस्थापन व सोयी सुविधा)’ या विशेष योजनेला मंजुरी दिली आहे.
या योजनेअंतर्गत मंदिर परिसरात आधुनिक आणि सुरक्षित पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. नवीन भव्य सभामंडप, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था, विस्तारित पायरी मार्ग, रांगा व्यवस्थापन, तसेच आपत्कालीन सुविधा विकसित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जुना सभामंडप पूर्णपणे उतरवण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर दगड, बांधकाम साहित्य आणि यंत्रसामग्री परिसरात ठेवण्यात आली आहे.
कामांच्या स्वरूपामुळे आणि परिसराच्या डोंगराळ भौगोलिक परिस्थितीमुळे बांधकाम सुरू असताना मंदिर खुले ठेवणे धोकादायक ठरू शकते, अशी प्रशासनाची भूमिका आहे. गर्दीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी महाशिवरात्रीचा कालावधी वगळून मंदिर खुले ठेवण्याचा विचार होता. मात्र सध्या कामांचा वेग, बांधकामाची व्याप्ती आणि सुरक्षिततेचे मुद्दे लक्षात घेता हा निर्णय बदलण्यात आला आहे. दरम्यान, जून ते सप्टेंबर या पावसाळी काळात या भागात अतिवृष्टी होत असल्याने त्या काळात कामे करणे अशक्य असते. त्यामुळे उपलब्ध कालावधीतच सर्व कामे पूर्ण करणे प्रशासनासाठी अत्यावश्यक आहे.
मंदिर प्रशासनाने भाविकांना पर्यायी नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच स्थानिक नागरिक, व्यापारी आणि भाविकांनी या निर्णयाला सहकार्य करून विकासकामांना गती द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
कुंभमेळ्यापूर्वी भीमाशंकरला अत्याधुनिक आणि सुरक्षित धार्मिक स्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रशासनाचा मानस असून, भविष्यात भाविकांना अधिक सोयीस्कर व सुसज्ज दर्शन व्यवस्था उपलब्ध होणार आहे.