Home Breaking News माता रमाबाई नगरमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; जीर्ण पाईपलाईन तातडीने बदलण्याची...

माता रमाबाई नगरमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; जीर्ण पाईपलाईन तातडीने बदलण्याची मागणी

38
0
मुंबई :
भांडुप पूर्व येथील प्रभाग क्रमांक ११४ मधील माता रमाबाई नगर परिसरात पिण्याच्या पाण्यात दूषित घटक मिसळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नळातून येणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येत असून पाण्याचा रंगही गढूळ दिसत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या समस्येमुळे अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत आहे, तर काही जणांना उकळून पाणी वापरावे लागत आहे. यामुळे अतिरिक्त आर्थिक भार पडत असून नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी वाढत आहे.
स्थानिक रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत एस-विभागाच्या सहाय्यक आयुक्त मा. समरीन सय्यद यांच्या दालनात जाऊन निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी परिसरातील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन अत्यंत जुनी व गंजलेली असल्याचे निदर्शनास आणून दिले. अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटलेली असून सांडपाणी आणि गटाराचे पाणी पिण्याच्या लाईनमध्ये मिसळत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
“ही केवळ पाण्याची समस्या नसून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. डेंग्यू, टायफॉईड, गॅस्ट्रो यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने नवीन पाईपलाईन टाकून शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा,” अशी ठाम मागणी नागरिकांनी केली.
सहाय्यक आयुक्तांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाला तातडीने पाहणी करण्याचे आदेश दिले असून लवकरात लवकर पाईपलाईन बदलण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, समस्या निकाली निघाली नाही तर आंदोलनाचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून तो अबाधित ठेवण्यासाठी महापालिकेने त्वरित पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.