Home Breaking News जॉन्सन अँड जॉन्सनच्या दोषपूर्ण इम्प्लांटसाठी पुणेतील व्यावसायिकाला NCDRC कडून ₹३५ लाखांची भरपाई.

जॉन्सन अँड जॉन्सनच्या दोषपूर्ण इम्प्लांटसाठी पुणेतील व्यावसायिकाला NCDRC कडून ₹३५ लाखांची भरपाई.

पुण्यातील व्यावसायिक पुरुषोत्तम लोहिया यांना जॉन्सन अँड जॉन्सनच्या दोषपूर्ण वैद्यकीय इम्प्लांटमुळे सहन कराव्या लागलेल्या शारीरिक व मानसिक त्रासासाठी सात वर्षांच्या न्यायलयीन संघर्षानंतर राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (NCDRC) ₹३५ लाखांची भरपाई मंजूर केली आहे. लोहिया यांनी दोषपूर्ण ASR XL फेमोरल इम्प्लांटमुळे झालेल्या नुकसानासाठी ₹५ कोटींचा दावा दाखल केला होता.

NCDRC ने ₹३५ लाखांची भरपाई, तसेच मानसिक त्रासासाठी ₹१ लाख मंजूर केले आहेत. याशिवाय, दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जॉन्सन अँड जॉन्सनने लोहियांना आधीच ₹२५ लाख भरपाई दिली होती, त्यामुळे आता उर्वरित ₹१० लाख भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

NCDRC च्या निकालाचा मुख्य आधार ‘आर्य समिती’च्या अहवालावर होता, ज्यामध्ये ASR XL इम्प्लांटमध्ये गंभीर दोष असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. हे दोष शारीरिक समस्यांसह शरीरात विषारी धातूंच्या आयनचे स्त्राव निर्माण करतात, असा अहवालात उल्लेख आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने या अहवालाला आव्हान दिले होते, परंतु आयोगाने कंपनीला दोषी ठरवून लोहियांच्या बाजूने निकाल दिला.

लोहियांनी सांगितले की, या दोषपूर्ण इम्प्लांटमुळे त्यांच्या बांधकाम व्यवसायावर परिणाम झाला, ज्यामुळे पुण्यातील महत्वाचे प्रकल्प रखडले. पुनः शस्त्रक्रियेनंतरही लोहिया अजूनही वेदना सहन करत आहेत आणि त्यांच्या व्यावसायिक जबाबदाऱ्या पूर्णपणे सांभाळण्यास असमर्थ आहेत.