पुणे : Pune Police यांच्या गुन्हे शाखेतील युनिट–४ ने धडाकेबाज कारवाई करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत पाहिजे असलेला आरोपी आठ महिन्यांनंतर अटक करण्यात यश मिळवले आहे. शहरातील गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला हा आरोपी दीर्घकाळ फरार होता.
गुप्त माहितीवरून सापळा
वरिष्ठांच्या आदेशानुसार युनिट–४ चे अधिकारी आणि कर्मचारी गंभीर गुन्हे व मोक्का प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेत पेट्रोलिंग करत होते. दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस अंमलदार अजय गायकवाड, सुभाष आव्हाड आणि वैभव रणपिसे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, “नाना ऊर्फ कार्तिक बारमुख” हा रहाटणी परिसरातील फॉच्युन हॉस्पिटल मागे, सिद्धिविनायक कॉलनी, नकाते वस्ती येथे येणार आहे.
मिळालेल्या वर्णनानुसार हिरवा टी-शर्ट आणि निळी जीन्स परिधान केलेल्या संशयितावर पथकाने तात्काळ सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव नाना ऊर्फ कार्तिक बाळू बारमुख (वय २३, रा. इंदिरा वसाहत, औंध, पुणे) असे सांगितले.
मोक्का गुन्ह्यातील सहभाग
Chatushringi Police Station येथे संपर्क साधला असता, गुन्हा रजिस्टर क्रमांक २५३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता व आर्म अॅक्ट तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ च्या विविध कलमान्वये तो पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. गेल्या आठ महिन्यांपासून तो पोलिसांना चकवा देत होता.
पुढील कारवाई
आरोपीस पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्याकडून गुन्हेगारी नेटवर्कबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शन
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या सूचनेनुसार युनिट–४ च्या पथकाने समन्वय साधून ही कारवाई यशस्वी केली.
गुन्हेगारीविरोधातील मोहीम तीव्र
पुणे शहरात संघटित गुन्हेगारीविरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून फरार आरोपींना शोधून काढण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. अशा कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.