पुणे : अंमली पदार्थविरोधी कारवाईत पुणे पोलिसांनी मोठे यश संपादन करत राजस्थानपर्यंत जाळे पसरलेल्या मेफेड्रॉन (एमडी) तस्करी करणाऱ्या अंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल १ किलो ९६० ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले असून, एकूण ४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दि. ०३/०२/२०२६ रोजी पहाटे ४.३५ वाजता खराडी येथील ईऑन फेज-२ मागील गेट परिसरात दोन इसम पांढऱ्या स्वीफ्ट कारमधून २७ ग्रॅम एमडी व इतर साहित्य बेकायदेशीररीत्या बाळगताना आढळले. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक कारवाईत १२.४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी सखोल तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे या प्रकरणाचा विस्तार राजस्थानपर्यंत असल्याचे उघड केले. आरोपी मोतीसिंह राजपुरोहित व हरीष देवासी यांच्या चौकशीतून राजस्थानमधून एमडी पुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर पोलिसांनी सापळा रचून योगेश ऊर्फ मनीष बिष्णोई याला १५१ ग्रॅम एमडीसह अटक केली. पुढील तपासात त्याचा साथीदार सचिन ऊर्फ एस.के. बिष्णोई याला हडपसर-मुंढवा परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख रक्कम व मोबाईल जप्त करण्यात आला.
तपासाची साखळी पुढे नेत पोलिसांनी मांजरी बुद्रुक येथील अमित घुले याला त्याच्या फॉर्च्यूनर वाहनासह ३९८ ग्रॅम एमडीसह अटक केली. वाहन, मोबाईल आणि अंमली पदार्थ मिळून १.०२ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यानंतर विशेष पथके राजस्थानमध्ये रवाना करण्यात आली. बालोतरा येथून मुख्य वितरक रतनलाल जाठ याला अटक करून त्याच्याकडून १ किलो ३८४ ग्रॅम एमडी (किंमत २.७६ कोटी रुपये) जप्त करण्यात आले. तसेच फरार आरोपी रामकरण जाट ऊर्फ चौधरी यालाही ताब्यात घेण्यात आले.
संपूर्ण कारवाईत एकूण १,९६० ग्रॅम एमडी, मोबाईल, फॉर्च्यूनर गाडी आणि इतर साहित्य असा एकूण ४.२७ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पुणे-राजस्थान अंमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे उद्ध्वस्त झाले असून शहरातील तरुणाईला विषारी विळख्यात अडकवणाऱ्या टोळीवर मोठा आघात झाला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, मनोजकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त सोमय मुंडे, निखील पिंगळे आणि सहायक आयुक्त प्रांजली सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पंडीत रेजितवाड, रविंद्र गोडसे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.
पुणे पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी मोहिम अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला असून नागरिकांनीही संशयास्पद हालचालींबाबत त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.