Home Breaking News सहकारनगर पोलिसांची कारवाई; बसमधील महिलांचे दागिने चोरणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद, २.०२...

सहकारनगर पोलिसांची कारवाई; बसमधील महिलांचे दागिने चोरणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद, २.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त

15
0
पुणे : बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून २,०२,००० रुपये किंमतीची सोन्याची बांगडी जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे प्रवाशांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे.
दि. ०९/०९/२०२६ रोजी फिर्यादी महिला भोसरी बस स्टॉप ते बालाजीनगर बस स्टॉप असा पीएमपीएमएल बसने प्रवास करत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या उजव्या हातातील सोन्याची बांगडी लंपास केली होती. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३८९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलीस हवालदार अमोल पवार यांना बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की ही चोरी रेकॉर्डवरील गुन्हेगार गोविंद गायकवाड आणि त्याच्या साथीदाराने केली आहे. तपास करताना आरोपी गोविंद गायकवाड हा मालवण पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृह, ओरस (सिंधुदुर्ग) येथे असल्याचे निष्पन्न झाले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने जिल्हा कारागृह, ओरस येथून आरोपी १) गोविंद विठ्ठल गायकवाड (वय ३९, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे) आणि २) वैभव शैलेश गायकवाड (वय २८, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) यांना ताब्यात घेऊन पुण्यात आणले. चौकशीत गोविंद गायकवाड याने आपल्या साथीदार वैभव गायकवाडसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून चोरीस गेलेली सोन्याची बांगडी पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गोविंद गायकवाड याच्यावर खुनाचा प्रयत्न (३), मारामारी (१) आणि चोरी (९) असे एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. तर वैभव गायकवाड याच्यावर खुनाचा प्रयत्न (१), जबरी चोरी (१) आणि चोरी (२) असे एकूण ४ गुन्हे दाखल आहेत.
ही उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ मिलिंद मोहीते, सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग धन्यकुमार घोडसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे, सद्दाम हुसेन फकीर, सहाय्यक पोउपनिरीक्षक बापू खुटवड तसेच पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतरे, बजरंग पवार, किरण कांबळे आदींचा सहभाग होता. पुणे शहर पोलिसांनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना मौल्यवान दागिने सुरक्षित ठेवण्याचे आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.