Home Breaking News वाघळीची लेक रेखाताई धनगर यांना ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’; चाळीसगावचा अभिमान उंचावला

वाघळीची लेक रेखाताई धनगर यांना ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’; चाळीसगावचा अभिमान उंचावला

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावची सुपुत्री रेखाताई धनगर यांनी बेसबॉल या क्रीडाप्रकारात उल्लेखनीय यश संपादन करत महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त केला आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण चाळीसगाव तालुक्याचा मान उंचावला असून ग्रामीण भागातील खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे.
रेखाताई यांनी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत सातत्याने आपली छाप पाडली आहे. कठोर परिश्रम, जिद्द आणि शिस्तबद्ध सराव यांच्या जोरावर त्यांनी बेसबॉलसारख्या तुलनेने कमी परिचित क्रीडाप्रकारात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून येत असतानाही त्यांनी मोठी स्वप्ने पाहिली आणि ती पूर्ण करून दाखवली.
आज रेखाताई यांनी त्यांचे पती श्री. अक्षय नरुटे यांच्यासह माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या या यशामागे कुटुंबियांचे पाठबळ आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शनही तितकेच महत्त्वाचे असल्याचे नमूद करण्यात आले.
रेखाताई यांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सहभागासाठी यापूर्वी शक्य ती मदत करण्याची संधी मिळाली होती. त्यांच्या प्रगतीचा प्रत्येक टप्पा पाहताना विशेष समाधान वाटत आहे. राज्यस्तरावर मिळालेला हा सन्मान त्यांच्या कष्टांचे फलित असून भविष्यात राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरही त्या देशाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
ग्रामीण भागातील खेळाडूंना आवश्यक सुविधा, प्रशिक्षण आणि आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. क्रीडांगणे, प्रशिक्षण शिबिरे आणि शासकीय योजना यांचा लाभ अधिकाधिक खेळाडूंना मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. “ग्रामीण खेळाडूंनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी धाडसाने पुढे यावे,” असे आवाहनही करण्यात आले.
रेखाताई धनगर यांचे यश हे चाळीसगाव तालुक्यासाठी अभिमानाची बाब असून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.