Home Breaking News मोठी कारवाई : खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद; ३ गावठी पिस्टल व...

मोठी कारवाई : खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद; ३ गावठी पिस्टल व १२ जिवंत काडतुसे जप्त

पुणे : Pune Police च्या गुन्हे शाखेतील युनिट ३ ने आगामी शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करत खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपीला ३ गावठी पिस्टल व १२ जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळला असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे.
दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे व त्यांच्या पथकातील अधिकारी-अंमलदार हे वरिष्ठांच्या आदेशानुसार अवैध धंदे, मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपी, रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच तडीपार आरोपी यांच्यावर कारवाई करण्यासाठी सिंहगड रोड व नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.
दरम्यान, पोलीस अंमलदार किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुंजाळ व योगेश झेंडे यांना गोपनीय माहितीदारामार्फत बातमी मिळाली की सागर दत्तात्रय सोनलकर (वय २५ वर्षे, रा. प्रसाद पार्क समोर, डीएसके पायथा, धायरी, पुणे) हा इसम प्रयेजा सिटी, वडगाव बुडा परिसरात अवैधरित्या ३ गावठी पिस्टल व १२ जिवंत काडतुसे बाळगून आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून शिताफीने कारवाई केली. आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून ३ गावठी पिस्टल व १२ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. सदर शस्त्रसाठा कोणत्या गुन्ह्यासाठी वापरण्यात येणार होता याचा तपास सुरू असून आरोपीचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा सखोल तपास करण्यात येत आहे.
आरोपीविरुद्ध शस्त्र कायद्यानुसार तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करून पुढील तपासासाठी त्याला संबंधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. आगामी सण-उत्सवांच्या काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त श्री. शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे (युनिट ३) यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे व पथकातील इतर अंमलदारांनी ही यशस्वी कामगिरी बजावली. पुणे शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.