Home Breaking News खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल जप्त, संभाव्य खून कट...

खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल जप्त, संभाव्य खून कट उधळला

16
0
पुणे : Pune Police च्या गुन्हे शाखेअंतर्गत कार्यरत खंडणी विरोधी पथक १ ने वेळीच केलेल्या धाडसी कारवाईत एका सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल जप्त करून संभाव्य खुनाचा कट उधळला आहे. या कारवाईमुळे पुणे शहरात मोठा रक्तपात टळला असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात पोलिसांना यश आले आहे.
दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी खंडणी विरोधी पथक १ चे अधिकारी व अंमलदार विना परवाना शस्त्र बाळगणाऱ्या फरारी व तडीपार आरोपींचा शोध घेत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत ऑक्टोबर २०२४ मध्ये दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी गणेश रेणूसे हा जामिनावर सुटला असून त्याच्यावर हल्ला झालेल्या संतोष उर्फ भावड्या साळुंखे याच्याकडून सूड उगवला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर गणेश रेणूसेच्या नातेवाईकांनी संतोष साळुंखे याचा खून करण्यासाठी पिस्टलची व्यवस्था केल्याची माहिती मिळाली.
सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांना कळविण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ शोधमोहीम राबविण्यात आली. दांडेकर पूल परिसरातून चेतन उर्फ बाळ्या सिद्धनाथ जाधव (वय २६, रा. दत्तवाडी, पुणे) यास मांगीरबाबा चौक येथे ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून १ गावठी पिस्टल, मॅगझिनसह २ जिवंत काडतुसे असा सुमारे ३५,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अधिक चौकशीत आरोपीने कबुली दिली की, गणेश रेणूसेच्या नातेवाईकांनी संतोष उर्फ भावड्या साळुंखे याचा खून घडवून आणण्यासाठी त्याची निवड केली होती. यासाठी ३५ हजार रुपयांना गावठी पिस्टल खरेदी करण्यात आले होते. हा कट वेळेआधीच उधळल्यामुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळला.
सदर आरोपीविरुद्ध पर्वती पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ५५, आर्म अॅक्ट कलम ३ (२५), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त श्री. शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोउपनि रामेश्वर पार्वे तसेच पथकातील इतर अंमलदारांनी ही यशस्वी मोहीम पार पाडली. पुणे शहरातील गुन्हेगारीवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला असून, नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती तत्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.