Home Breaking News महापालिकेकडून मराठी भाषा गौरव दिनी आयोजित काव्य संमेलनाला रसिकांची दाद

महापालिकेकडून मराठी भाषा गौरव दिनी आयोजित काव्य संमेलनाला रसिकांची दाद

42
0
पिंपरी : अक्षरांचा सुगंध, शब्दांची लय आणि माय मराठीबद्दलचा अपार अभिमान… अशा उत्साहपूर्ण वातावरणात पिंपरी चिंचवड शहरातील कवींकडून मराठीच्या गौरवशाली परंपरेला काव्यात्मक अभिवादन करण्यात आले.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पिंपरी चिंचवड महापालिकेने महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर , अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि लोककलाविषयक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये स्थानिक कवींचा सहभाग असलेले कविसंमेलन ज्येष्ठ कवी राज आहेरराव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
महापालिकेचे विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह शहरातील रसिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कविसंमेलनात स्थानिक कवींच्या ओजस्वी उपस्थितीत मराठी भाषेची श्रीमंती, तिची परंपरा आणि तिचे अभिजात सौंदर्य कवितांच्या माध्यमातून रसिकांसमोर उलगडले गेले.
कवी हेमंत जोशी यांनी ‘रक्तात नांदतो शब्द, मराठी शुद्ध नसे हे युद्ध, सदा कविबद्ध मराठी…’ या ओळींनी सभागृह भारावून टाकले. त्यांच्या शब्दांतून मराठीबद्दलचा जाज्वल्य अभिमान आणि भाषेच्या अस्मितेचा स्वर घुमला. कवी सुहास घुमरे यांनी ‘मी नाणेघाटात मराठीचं झाड लावलं…’ या कवितेतून मराठीची पाळेमुळे इतिहासात किती खोलवर रुजलेली आहेत, याची जाणीव करून दिली. कवी सीमा गांधी यांनी ‘पुढला जन्म माय मराठी अक्षरांचा मिळावा…’ या ओळींमधून मराठी भाषेची गोडी आणि तिच्यावरील निष्ठा हृदयस्पर्शीपणे व्यक्त केली. तर, कवी मानसी चिटणीस यांनी ‘संतबोलीने पावन झाली अमृत कहाणी…’ या कवितेतून संतपरंपरेने मराठी भाषेला दिलेल्या अमूल्य वारशाचे गुणगान केले. कवी मिनल साकोरे यांनी ‘उगा मी शहरी आहे…’ ही कविता सादर करून आधुनिक जीवनातील बदलत्या भावविश्वावर भाष्य केले.
याचबरोबर कवी अरुण बोऱ्हाडे, सुरेश कंक, चंद्रकांत धस, डॉ. पौर्णिमा कोल्हे, साविताई इंगळे, माधुरी विधाते, वंदना इन्नाणी, नंदकुमार कांबळे, अण्णा जोगदंड, मनीष परिहार, दिनेश साबळे, नेहा जाधववार या कवींनी आपल्या सशक्त सादरीकरणातून रसिकांची मने जिंकली. प्रत्येक कवीने आपल्या शब्दफुलांनी मराठी भाषेच्या वैभवाला नवी उजळणी दिली. सुभाष चव्हाण यांनी शंख वाजवण्याची कला सादर केली.
यावेळी ज्येष्ठ कवी राज आहेरराव म्हणाले की, ‘कविता केवळ लिहिण्यासाठी नसते, ती जगण्यासाठी असते. काव्यभावना जशी अंतर्मनात असते, तशीच ती सादरीकरणातही जिवंत व्हावी. काव्यसाद आत्मसात केल्याशिवाय कविता पूर्णत्वाला जात नाही,’ असे देखील ते म्हणाले. रसिकांची टाळ्यांची दाद व मराठी भाषेची गोडी सांगणाऱ्या कवितांनी रंगलेला हा काव्यमय सोहळा स्मरणीय ठरला.
‘आवाज लोकगीतांचा… गंध मराठी मातीचा’ कार्यक्रमातून मराठी संस्कृतीचा रंगतदार आविष्कार
‘आवाज लोकगीतांचा… गंध मराठी मातीचा’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित रसिकांना अक्षरशः मराठी संस्कृतीच्या समृद्ध परंपरेचा अनुभव दिला.
कार्यक्रमाची सुरुवात मराठी अस्मिता, भाषा अभिमान आणि मातृभूमीप्रेम जागविणाऱ्या सादरीकरणांनी झाली. महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचा, शौर्यगाथांचा आणि लोकजीवनातील भावविश्वाचा सुरेल आविष्कार रंगमंचावर उलगडत गेला. ग्रामीण जीवनातील आनंद, सण-उत्सवांची उत्स्फूर्तता, नातेसंबंधातील जिव्हाळा, विवाहसंस्कृतीतील रुढीपरंपरा तसेच समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या लोकगीतांनी वातावरण भारावून गेले.
लोकनृत्य, लावणी, गोंधळ, विनोदी लोकसंगीत आणि पारंपरिक कलाप्रकारांच्या माध्यमातून मराठी मातीतील जीवनरस प्रेक्षकांसमोर साकार झाला. शेतकरी जीवनातील उत्साह, ग्रामीण संस्कृतीतील निरागसता, स्त्री-पुरुष नात्यांतील भावस्पर्शी क्षण तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या कलाविष्कारांनी कार्यक्रमाला बहुरंगी रूप प्राप्त झाले.
दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या शैलीची आठवण करून देणाऱ्या सादरीकरणांनी प्रेक्षागृहात हास्य, टाळ्या आणि उत्साहाची लहर निर्माण केली. ऐतिहासिक पराक्रम, समाजजागृती आणि लोकनायकांच्या कार्याची स्मृती जागविणाऱ्या गीतनाट्य सादरीकरणांनी कार्यक्रमाला प्रेरणादायी उंची मिळाली.
संपूर्ण कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मराठी भाषा, लोककला आणि सांस्कृतिक वारशाविषयीचा अभिमान व्यक्त केला. मराठी भाषेचा गोडवा, लोकपरंपरेची ताकद आणि सांस्कृतिक वैभव नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न या उपक्रमातून यशस्वीपणे साध्य झाला.
प्रसिद्ध गायक विजय सरतापे, जगदीश गोरसे, विशाल ओव्हाळ, राणी म्हस्के, धीरज वानखेडे, चित्रसेन भवार, करुणा रणपिसे यांनी विविध लोकगीतांचे सादरीकरण केले. तर त्यांना वादक सागर दुपारगुडे, सादिक शेख, राहुल भोंडवे, स्वप्नील सकट, सुनील चव्हाण, साहिल कांबळे, अजय पाटोळे, राहुल बनसोडे यांनी साथ दिली. संजना डोळस, आकाश गायकवाड, रवींद्र शिंदे, अमोल आडगळे, अशोक विश्वकर्मा, कविता काळे, आरोही पवार, प्रतीक्षा गायकवाड यांनी नृत्य सादरीकरण केले. लीनेश घाडगे यांनी सूत्रसंचालन केले.