पुणे : कर्जाच्या व्यवहारातून सुरू झालेला वाद ब्लॅकमेलिंग, लैंगिक अत्याचार आणि खंडणीपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. महिलांचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून धमकी देणे, जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणे तसेच प्रतिष्ठित उद्योजकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रवृत्त करणे अशा गंभीर आरोपांखाली दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२४ मध्ये फिर्यादी यांनी आरोपींकडून २ लाख रुपये दरमहा ५ टक्के व्याजाने घेतले होते. त्यानंतर फिर्यादी यांनी ३ लाख ६० हजार रुपये परत केले असतानाही आरोपींकडून आणखी पैशांची मागणी सुरूच होती. रक्कम देण्यास नकार दिल्याने फिर्यादी यांना सतत मानसिक व शारीरिक त्रास देण्यात आला.
दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी प्रताप रमेश जाधव याने फिर्यादीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर फिर्यादीचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांना गप्प राहण्यास भाग पाडण्यात आले. इतकेच नव्हे तर ऑक्टोबर २०२५ मध्ये बारामती एमआयडीसी येथील एका उद्योजकाविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादी यांना प्रवृत्त करण्यात आले. गुन्हा दाखल केल्यास २० ते २५ लाख रुपये आणि बारामती येथे फ्लॅट नावावर करून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते.
फिर्यादी यांनी हा प्रस्ताव नाकारल्याने आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. महिला आरोपी पल्लवी जाधव हिने उच्चभ्रू आणि प्रतिष्ठित व्यक्तींना जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत फोटो काढणे, नंतर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणे आणि मोठ्या रकमेची खंडणी उकळणे, असा प्रकार केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. अनेक वेळा फिर्यादी यांच्या माध्यमातून पैसे स्वीकारल्याचेही उघड झाले आहे.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ६४, ६४ (२)(एम), ७७, ३०८ (३), ४९, ३५१ (२), ३(५) तसेच सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९, ४५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही आरोपींना दि. १४/०२/२०२६ रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांकडून आर्थिक व्यवहार, मोबाईल डेटा आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ मिलिंद मोहीते, सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सपोनि स्नेहल थोरात, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकाने केली.
पुणे पोलिसांनी नागरिकांना सावकारी व्यवहार करताना कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचे आणि कोणत्याही प्रकारच्या ब्लॅकमेलिंग किंवा धमकीबाबत त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.