Home Breaking News पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले तातडीचे निर्देश: अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...

पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले तातडीचे निर्देश: अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सखोल उपाययोजना

(File photo: PTI)

मुंबई: पुण्यातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत विशेष लक्ष दिले. पुणे शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि औद्योगिक संधींमुळे हे शहर वेगळ्या ओळखीत आले आहे. यापुढे पुणे शहराला वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील उपस्थित होते. पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त योगेश म्हसे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. पृथ्वीराज इत्यादी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी सादरीकरण केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुणे शहरातील औद्योगिक विकासामुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या विविध भागांतून नागरिक पुण्यात येत आहेत आणि त्यामुळे शहराचे झपाट्याने नागरीकरण झाले आहे. पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पायाभूत सोयीसुविधांवर ताण आला आहे आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर कोणत्याही परिस्थितीत तोडगा काढला पाहिजे. यासाठी विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की, पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येतील. सुरुवातीला कमी खर्चाच्या आणि कमी कालावधीत पूर्ण होणाऱ्या उपाययोजनांवर लक्ष दिले जाईल. यामध्ये एकेरी वाहतूक व्यवस्था सुरू करणे, रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे काढणे, सिग्नलची वेळ कमी करणे, सिग्नलविरहित वाहतूक व्यवस्थापन, अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण आणि मिसिंग लिंक्स जोडणे यासारख्या उपाययोजना करण्यात येतील.

पुणे वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक कोंडीसाठी विस्तृत प्रस्ताव सादर करावा. याअनुषंगाने महापालिकेने पुणे ते कात्रज रस्त्यावर नवले जंक्शन येथील अतिक्रमण हटवावे. पुणे शहर पोलीस आयुक्तांनी पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा.

नवले ब्रिज, कोरेगाव पार्क, एबीसी चौक इत्यादी ठिकाणांची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना कराव्यात. पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे.

वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित पोलीस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगर विकास प्राधिकरण यांना समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी वाहतूकविषयक तज्ज्ञ प्रतिनिधींचा समावेश असणारी समन्वय समिती स्थापन केली जाईल, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.