पुणे–सोलापूर महामार्ग हा पुणे विभागातील सर्वाधिक भारवाहक मार्गांपैकी एक. उद्योग, आयटी, व्यापार आणि ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणातील वाहतुकीमुळे या मार्गावर दररोज तीव्र कोंडी निर्माण होते. नागरिकांच्या या दीर्घकालीन समस्येला गांभीर्याने लक्षात घेत राज्य शासनाने अखेर एक महत्त्वाचा पाऊल उचलला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (अजित दादा) यांनी आज माहिती देताना सांगितले की, राज्य सरकार पायाभूत सुविधा मजबूत करण्यास सर्वाधिक प्राधान्य देत आहे. याच अनुषंगाने पुणे–सोलापूर महामार्गासाठी आखलेल्या पूर्वीच्या प्लॅनमध्ये सुधारणा करण्यात आली असून नव्या आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन प्लॅननुसार उड्डाणपूल आता हडपसरऐवजी भैरोबा नाल्यापासून सुरू होऊन थेट यवतपर्यंत सहा-पदरी स्वरूपात जाणार आहे. या विस्तृत आणि आधुनिक उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईलच, शिवाय अपघातांचे प्रमाणही घटण्याची शक्यता आहे.
अजित दादांनी सांगितले की, हा प्रकल्प त्वरित मार्गी लागावा यासाठी ते स्वतः पाठपुरावा करणार आहेत. आवश्यक तांत्रिक तपासण्या, जागा संपादन, संरचनात्मक आराखडे आणि निधी वितरण यासाठी विभागीय अधिकाऱ्यांना दिशानिर्देश देण्यात आले आहेत. “नागरिकांना दिलासा मिळावा आणि महामार्गावरचा ताण कमी व्हावा, हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे,” असेही त्यांनी नमूद केले. स्थानिक उद्योजक, वाहनचालक आणि रहिवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले असून महामार्ग विकासाच्या या नव्या टप्प्यामुळे पुणे परिसरातील वाहतुकीचे चित्र मोठ्या प्रमाणात बदलणार असल्याचे अपेक्षित आहे.