Home Breaking News विश्वेश कुलकर्णी यांची ICHRA च्या सरचिटणीसपदी एकमताने निवड; जागतिक मानव संसाधन क्षेत्रात...

विश्वेश कुलकर्णी यांची ICHRA च्या सरचिटणीसपदी एकमताने निवड; जागतिक मानव संसाधन क्षेत्रात पुण्याचा मान उंचावला

27
0
पुणे : मानव संसाधन व्यवस्थापन क्षेत्रात महाराष्ट्रासह देशासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी महत्त्वपूर्ण घटना घडली असून पुण्यातील ज्येष्ठ मानव संसाधन तज्ज्ञ विश्वेश कुलकर्णी यांची इंटरनॅशनल कॉन्फिडरेशन ऑफ ह्युमन रिसोर्स असोसिएशन्स (ICHRA) या जागतिक संस्थेच्या सरचिटणीसपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. ट्युनिशियातील ट्युनिस येथे नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ICHRA ही मानव संसाधन विकास क्षेत्रातील जागतिक पातळीवरील अग्रगण्य संघटना असून जगभरातील सुमारे १२५ देशांतील मनुष्यबळ व्यवस्थापन संस्था, संघटना आणि व्यावसायिक या मंचाशी संलग्न आहेत. या संघटनेमार्फत विविध देशांतील उद्योग, कंपन्या आणि संस्थांमधील मनुष्यबळ व्यवस्थापनाशी संबंधित प्रश्नांवर मार्गदर्शन केले जाते. तसेच कार्यशाळा, परिसंवाद, प्रशिक्षण सत्रे, संशोधन प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय परिषदांच्या माध्यमातून मानव संसाधन क्षेत्रातील नव्या संकल्पना व सर्वोत्तम कार्यपद्धतींचा प्रसार केला जातो.
सरचिटणीस म्हणून विश्वेश कुलकर्णी यांच्यावर आयएलओ (ILO) आणि संयुक्त राष्ट्रसंघ (UNO) यांसारख्या जागतिक संस्थांमध्ये मानव संसाधन विकासाला अधिकृत स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, विविध देशांतील HR संस्थांचे जाळे अधिक मजबूत करणे आणि जागतिक सहकार्य वाढवणे यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ICHRA चे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
कुलकर्णी हे गेली तब्बल ४२ वर्षे मानव संसाधन व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत आहेत. कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘यशस्वी’ संस्थेचे ते संस्थापक आहेत. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (NIPM) चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पाच वर्षे काम पाहिले असून देशातील HR क्षेत्राला नवे दिशा-निर्देश दिले आहेत. याशिवाय एशिया पॅसिफिक फेडरेशन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट (APFHRM) चे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी १८ देशांमधील संस्थांशी समन्वय साधत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी नेतृत्व केले आहे.
त्यांच्या या निवडीमुळे पुणे शहराचे तसेच महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर उजळले असून औद्योगिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मानव संसाधन क्षेत्रात भारतीय नेतृत्वाची छाप अधिक ठळक करण्यासाठी ही निवड मैलाचा दगड ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.