Home Breaking News ताम्हिणी घाटात भीषण बस अपघात: ५ ठार, २७ जखमी; लग्न समारंभाच्या आनंदावर...

ताम्हिणी घाटात भीषण बस अपघात: ५ ठार, २७ जखमी; लग्न समारंभाच्या आनंदावर शोककळा.

33
0

पुणे: ताम्हिणी घाटातील एका धोकादायक वळणावर झालेल्या बस अपघातात ५ जण ठार, तर २७ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. लोहगाव येथून महाडला लग्नासाठी निघालेल्या जाधव कुटुंबीयांची खासगी बस (एम एच १४ जी यु ३४०५) शुक्रवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास अपघातग्रस्त झाली.

अपघाताचा तपशील:

ताम्हिणी घाटातील एका तीव्र वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस कठड्याला धडकून काही अंतर खाली पलटी झाली. या अपघातात तीन महिला आणि दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये संगिता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदीप पवार, वंदना जाधव अशी नावे समोर आली आहेत, तर एका पुरुषाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे, मात्र त्याचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.

जखमींवर उपचार सुरू:

अपघातग्रस्त २७ जखमींना माणगाव येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत.

पोलीस व बचावकार्य:

घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्‍हाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस, रुग्णवाहिका, व स्थानिक बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवले. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी सांगितले की, ताम्हिणी घाटातील धोकादायक वळणांमुळे हा अपघात घडल्याचे दिसते.

शोककळा पसरली:

जाधव कुटुंबीय महाडमधील बिरवाडी येथे लग्न समारंभासाठी जात होते. मात्र, या अपघातामुळे आनंदाचा क्षण शोकांतरात बदलला आहे.