मुंबई : कुर्ला (पश्चिम) येथे सोमवारी रात्री झालेल्या भीषण BEST बस अपघाताने संपूर्ण मुंबई हादरली आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर ४२ जण जखमी झाले. याप्रकरणी बस चालक संजय मोरे यांना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करण्यासाठी न्यायालयाकडे संजय मोरे यांच्या कोठडीची मागणी केली आहे.
चालकाच्या हेतूवर संशय:
पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, या अपघातामध्ये चालकाचा हेतू जाणून घेणे गरजेचे आहे. त्यांनी बसला “हत्यार” म्हणून वापरून जाणूनबुजून गुन्हा केला का, याचा तपास होणे आवश्यक आहे. तसेच, या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा कट तर रचला गेला नाही, हे देखील तपासायचे आहे.
फक्त १० दिवसांचे प्रशिक्षण:
संजय मोरे यांना इलेक्ट्रिक बस चालविण्याचा कोणताही अनुभव नसल्याची माहिती समोर आली आहे. ते फक्त १० दिवसांचे प्रशिक्षण घेऊन इलेक्ट्रिक बस चालवत होते. या गंभीर मुद्द्यावर पोलिसांना तपास करायचा असून, बसच्या तांत्रिक स्थितीबाबतही अहवालाची प्रतीक्षा आहे.
बस तांत्रिक बिघाडामुळे अपघात?
संजय मोरे यांचे वकील समाधान सुळाणे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला असू शकतो. वाहन तपासणी करणे हे प्रशासनाचे काम आहे, त्यामुळे संजय मोरे यांना जबाबदार धरता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
न्यायालयाचा निर्णय:
पोलिसांच्या सखोल तपासाच्या युक्तिवादावर न्यायालयाने सहमती दर्शवली. संजय मोरे यांना २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
अपघाताचा दिवस:
सोमवारी रात्री ९.३० वाजता कुर्ला पश्चिम येथील एसजी बर्वे मार्गावर BESTची एक इलेक्ट्रिक बस नियंत्रणाबाहेर जाऊन पादचारी, वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून ४२ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, २२ वाहने देखील नुकसानग्रस्त झाली.
चालक दारूच्या नशेत नव्हता:
पोलिस तपासादरम्यान संजय मोरे मानसिकदृष्ट्या सजग असल्याचे दिसून आले आहे. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत त्यांनी दारूसेवन केले नसल्याचे स्पष्ट झाले.
तांत्रिक तपासणी सुरू:
अपघातग्रस्त बस ही हैदराबाद येथील ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने तयार केलेली आहे. बसमधील कोणताही यांत्रिक दोष होता का, हे जाणून घेण्यासाठी न्यायवैद्यक तज्ञ व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे.