मावळ (पुणे): मावळ तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे, ज्यामुळे पवना धरण शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून, पुण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. खडकवासलातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने काही भागात पाणी साचलं आहे.
याच दरम्यान, मुंबई आणि पुण्याच्या भाविकांसाठी श्रद्धास्थान असलेल्या कार्ला गडाच्या एकविरा देवीच्या पायऱ्यांवर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहू लागले आहे. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी आलेले अनेक भाविक आणि पर्यटक कार्ला गडावर अडकले आहेत.
गडावर राज्यभरातून अनेक भाविक आणि पर्यटक एकविरा देवीच्या दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी येतात. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी येथे तुफान गर्दी असते. आज सकाळपासूनच या भागात पावसाचा जोर कायम आहे, ज्यामुळे देवीच्या डोंगरावरून पाण्याचा प्रवाह पायऱ्यांवरून वाहत आहे. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पायऱ्यांवरच थांबावं लागलं आहे.
गेल्या एका महिन्यात कार्ला गडावर दोनदा पावसाचे पाणी पायऱ्यांवरून वाहण्याची घटना घडली आहे. सकाळपासूनच डोंगर भागात पाऊस झाल्याने पाण्याचा प्रवाह उताराच्या दिशेने वाढला आहे, ज्यामुळे गडावर धबधब्याचं स्वरूप आलं आहे.
स्थानिक दुकानदारांनाही या पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. कार्ला गड प्रशासनाने भाविकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षितपणे गडावर येण्याचे आवाहन केले आहे.