पिंपरी, दि. २० फेब्रुवारी २०२६ (माहिती व जनसंपर्क विभाग): “शिव चरित्र म्हणजे समृद्ध, स्वाभिमानी आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची खरी गुरुकिल्ली आहे,” असे प्रभावी प्रतिपादन सुप्रसिद्ध शिवशाहीर Vijay Maharaj Tanpure यांनी केले.
Pimpri-Chinchwad महानगरपालिकेच्या वतीने डांगे चौक, चिंचवड येथे गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधक पर्व २०२६’ अंतर्गत ‘यशाचा नवा मंत्र – शिवतंत्र’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
व्याख्यानादरम्यान Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंगांचे जिवंत आणि प्रभावी सादरीकरण करत डॉ. तनपुरे यांनी शिवचरित्राचा आधुनिक जीवनाशी असलेला संबंध स्पष्ट केला. “शिवचरित्र हे केवळ इतिहास नसून ते जीवनाला दिशा देणारे तत्वज्ञान आहे. नेतृत्व, शौर्य, संघटनशक्ती, दूरदृष्टी आणि स्वाभिमान या मूल्यांचा संगम म्हणजे शिवचरित्र,” असे ते म्हणाले.
आजच्या युवकांसमोरील स्पर्धा, वाढते ताणतणाव आणि दिशाहीनतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आत्मविश्वास, धैर्य आणि कर्तृत्व यांचे महत्त्व अधोरेखित केले. “भीतीवर मात करून पुढे जाणे हेच खरे शिवतत्त्व आहे. स्वप्न पाहा आणि त्या स्वप्नांसाठी कृती करा,” असे आवाहन त्यांनी तरुणांना केले. त्यांच्या ओजस्वी आणि प्रेरणादायी मांडणीमुळे उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
कार्यक्रमास नगरसदस्या शालिनी ताई गुजर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, निवेदक किशोर केदारी, ज्येष्ठ पत्रकार तथा शिव व्याख्याते अनिल वडघुले, करण तुपे, संकेत जोशी, शंकर जगताप (काका माउली) आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन किशोर केदारी यांनी केले.
दरम्यान, तणावमुक्त आणि सकारात्मक जीवनासाठी कृतज्ञतेचे महत्त्व पटवून देताना डॉ. तनपुरे यांनी उपस्थितांकडून ध्यानप्रक्रिया करून घेतली. आपल्या कुटुंबीयांप्रती व प्रिय व्यक्तीप्रती आभार व्यक्त करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या क्षणांनी सभागृहात भावनिक आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.
शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित या व्याख्यानातून शिवकालीन विचारांचे आधुनिक संदर्भात पुनरुज्जीवन झाले. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला. शिवप्रेरणेचा हा संदेश समाजात सकारात्मक परिवर्तन घडवेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला