पुणे | ५ मे २०२५ :- पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या चैन स्नॅचिंग पथकाने अचूक माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोठी कारवाई करत पुण्यातील नामांकित गुन्हेगार तेजस नितीन वायदंडे याला जेरबंद केले आहे. या कारवाईत तब्बल २,२०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, एकूण दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
दि. ०१ मे २०२५ रोजी नांदेड सिटी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना, चैन स्नॅचिंग पथकातील अधिकाऱ्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तेजस वायदंडे याच्यावर संशय घेतला. तपास अधिक खोलात घेतल्यावर आरोपी वैदवाडी, हडपसर येथे मोटारसायकलसह असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
पोलिस तपासात तेजस वायदंडे याने आपले नाव, वय २२, रा. चिंचवड गाव, पुणे असल्याचे सांगून गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणात त्याचे दोन साथीदार आरोपी क्र. २ वैभव राजेश कांबळे व क्र. ३ सचिन मल्लिकार्जुन स्वामी यांची नावेही समोर आली आहेत. तेजसने चोरीचे मंगळसूत्र त्याच्या ओळखीच्या ज्वेलर्सकडे विकले असल्याची कबुली दिली आहे.
याशिवाय, त्याच्या अंगझडतीतून एक सोन्याची अंगठीही जप्त करण्यात आली असून, निगडी पोलीस स्टेशनमध्येही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात नांदेड सिटी व निगडी पोलीस स्टेशन येथील अनुक्रमे गुन्हा रजिस्टर नंबर ४९/२०२५ आणि १३१/२०२५ नुसार तपास करण्यात आला आहे.
ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, सह आयुक्त श्री. रंजन शर्मा, अपर आयुक्त श्री. शैलेश बलकवडे, उप आयुक्त श्री. निखील पिंगळे, सहा. आयुक्त गणेश इंगळे व राजेंद्र मुळीक यांच्या निर्देशांनुसार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, संदीपान पवार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी झाली.
पोलीस अंमलदार बेरड, नाळे, साळवे, डापसे, राहुल इंगळे, बंटी सासवडकर, तनपुरे, गणेश ढगे, इरफान पठाण, अजित शिंदे, अमित गद्रे, गणेश गोसावी व मनोज खरपुडे यांनी या मोहिमेत मोलाचे योगदान दिले.
ही कारवाई म्हणजे गुन्हेगारांच्या मनात पोलिसांचा दरारा कायम असल्याचे स्पष्ट उदाहरण आहे. यामुळे शहरात जनतेमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.