पुणे – वाहतूक शाखा, पुणे शहर अंतर्गत विविध वाहतूक विभागांमध्ये दीर्घकाळापासून विनधनी आणि बेवारस स्थितीत असलेल्या तब्बल ४२० वाहनांची लिलाव प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या आदेशानुसार व पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) अमोल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे.
वाहतूक विभागाच्या अधिकृत पत्रकानुसार, पुणे शहरातील डेक्कन, शिवाजीनगर, खडक, समर्थ, भारती विद्यापीठ, सहकारनगर, लष्कर, स्वारगेट, वारजे, कोथरूड, सिंहगड रोड, येरवडा, चतु:श्रृंगी, खडकी, वानवडी, मुंढवा, हडपसर व कोंढवा या विभागांमध्ये ही वाहने ठेवण्यात आलेली आहेत.
या बेवारस वाहनांमध्ये दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहने यांचा समावेश असून, या वाहनांवरील मालकी हक्क दर्शविण्यासाठी मालक किंवा कायदेशीर हक्कदारांना १५ दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. ही मुदत २ मे २०२५ पासून सुरु झाली असून, संबंधित वाहनधारकांनी वेळेत पुढे येऊन मालकीचे कागदपत्र सादर करणे अत्यावश्यक आहे.
पोलीस उप-आयुक्त अमोल झेंडे यांनी स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ८५ (१) व ८५ (२) आणि कलम ८७ नुसार कारवाई करण्यात येईल. विहित मुदतीत मालकी हक्क सिद्ध न झाल्यास, ही सर्व वाहने शासनाच्या स्वाधीन समजली जातील आणि लिलाव प्रक्रियेत विक्रीसाठी काढण्यात येतील.
नागरिकांना आवाहन:
वाहने हरवलेली किंवा चोरीला गेलेली असल्याची शंका असलेल्या नागरिकांनी संबंधित वाहतूक विभागात जाऊन आपल्या वाहनाची तपासणी करून कागदपत्रांसह मालकी हक्क सादर करावा. ही संधी अंतिम आहे; नंतर कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही, असेही वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.
लिलावासाठी तयार असलेली वाहने:
-
दुचाकी
-
तीनचाकी (ऑटो रिक्षा)
-
चारचाकी (कार्स, जीप्स, इ.)





