Home Breaking News नेटफ्लिक्स, मोशन पिक्चर आणि युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपच्या प्रमुखांबरोबर मुख्यमंत्र्यांची चर्चा

नेटफ्लिक्स, मोशन पिक्चर आणि युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपच्या प्रमुखांबरोबर मुख्यमंत्र्यांची चर्चा

महाराष्ट्र राज्य आता केवळ औद्योगिकदृष्ट्या नव्हे, तर माध्यम व मनोरंजन क्षेत्रातही जागतिक नकाशावर आपली ठळक छाप उमटवत आहे. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेटफ्लिक्स, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप व मोशन पिक्चर असोसिएशनसारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांच्या प्रमुखांशी झालेली सखोल चर्चा.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे इंडिया व साउथ एशियाचे चेअरमन देवराज सान्याल, आणि मोशन पिक्चर असोसिएशनचे चेअरमन चार्ल्स रिवकिन यांच्यासोबत त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

या बैठकीत माध्यम, मनोरंजन व कौशल्य विकास या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा जागतिक पातळीवर प्रसार, ग्रामिण भागातील कथा माध्यमांतून पोहोचविण्याची क्षमता, तसेच गुणवत्तापूर्ण स्टुडिओस व प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून गुंतवणूक वाढविण्याचे धोरण या विषयांना विशेष प्राधान्य देण्यात आले.

भारत मनोरंजन उद्योगाचे भविष्य – टेड सारंडोस

नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस यांनी भारताला आगामी पाच वर्षांमध्ये जागतिक मनोरंजन क्षेत्रात अग्रणी बनण्याची प्रचंड संधी आहे, असे सांगितले. त्यांनी महाराष्ट्र शासनासोबत कौशल्य विकासासाठी नेटफ्लिक्सच्या सहकार्याची तयारी दर्शवली. विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रातील कहाण्या जगभर पोहचविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची तयारी त्यांनी दर्शवली.

श्री. सारंडोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करत, ‘WAVES शिखर संमेलन’ आयोजित केल्याबद्दल केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाचे मन:पूर्वक अभिनंदन केले.

WAVES हे मनोरंजन क्षेत्रासाठी क्रांतिकारी व्यासपीठ – देवराज सान्याल

युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे प्रमुख देवराज सान्याल यांनी अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर व निर्माता रितेश सिधवानी यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी WAVES संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. मनोरंजन उद्योगाला नवे क्षितिज देणारे हे व्यासपीठ आहे, असे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्रात जागतिक दर्जाचे स्टुडिओ – मोशन पिक्चर असोसिएशनची सकारात्मक भूमिका

मोशन पिक्चर असोसिएशनचे चेअरमन चार्ल्स रिवकिन यांनी फडणवीस यांची भेट घेऊन महाराष्ट्रात उच्चस्तरीय चित्रपट व स्ट्रिमिंग स्टुडिओ उभारण्याच्या शक्यतांवर चर्चा केली. भारताचा पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ याची आठवण करून देत त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या समृद्ध परंपरेचे कौतुक केले.

या बैठकीत बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षण, निर्मात्यांना प्रोत्साहन योजना आणि विदेशी गुंतवणुकीसाठी अनुकूल धोरण यावर देखील चर्चा झाली.

फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र ग्लोबल मीडिया हबकडे वाटचाल करणार!

या महत्त्वपूर्ण भेटींमुळे महाराष्ट्राला जागतिक मीडिया व मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीचा प्रचंड फायदा होण्याची शक्यता आहे. WAVES शिखर संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राची प्रतिमा जागतिक पातळीवर अधिक ठळक झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली ही पुढाकारात्मक भूमिका राज्याच्या भविष्यासाठी निश्चितच ऐतिहासिक ठरणार आहे.