पुण्यात उच्च सुरक्षा नंबर प्लेट (HSRP) बसविण्याच्या प्रक्रियेत गोंधळ अधिकच वाढला आहे. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर वाहन विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याने शहरातील शोरूम चालकांनी HSRP नंबर प्लेट बसविण्याच्या मोहिमेला तात्पुरता ब्रेक लावला आहे. परिणामी, नंबर प्लेट बदलण्यासाठी नियुक्त तारखांवर आलेल्या वाहनधारकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून त्यांची मोठी गैरसोय होत आहे.
गुढीपाडवा हा नवीन वाहन खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. यंदाही वाहन खरेदीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने विक्री प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी पुण्यातील शोरूम चालकांनी २० ते ३१ मार्चदरम्यान HSRP नंबर प्लेट बसविण्याचे काम थांबवले आहे. या निर्णयामुळे अनेक वाहनधारकांची गैरसोय होत असून त्यांना नंबर प्लेट बसवण्यासाठी पुन्हा एक एप्रिलनंतर यावे लागेल, असे सांगण्यात आले आहे.
हजारो नागरिकांची धावपळ
परिवहन विभागाने एक एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत असलेल्या सर्व वाहनांसाठी ३० जूनपर्यंत HSRP नंबर प्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. मात्र, सध्याच्या नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वेबसाइट बंद पडणे केंद्रे अचानक बंद होणे नंबर प्लेट वेळेत उपलब्ध न होणे गोंधळामुळे अनेकांच्या तारखा चुकणे
यामुळे पुण्यातील वाहनधारक त्रस्त झाले असून, अनेकांना वेळ वाया घालवत हेलपाटे मारावे लागत आहेत.
प्रशासनाकडून उपाययोजना करण्याच्या सूचना
पुण्यात सुरक्षा नंबर प्लेट बसविण्याचे काम ‘रोझमाटां’ कंपनीला सोपविण्यात आले आहे. मात्र, केंद्रांची संख्या वाढवण्यासंदर्भात अनेकदा सूचना देण्यात आल्या तरी अद्याप केंद्रांची संख्या वाढलेली नाही. यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी, “सुरक्षा नंबर प्लेट बसविणारे सेंटर अचानक बंद होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील आणि केंद्रांची संख्या वाढवली जाईल.” असे आश्वासन दिले आहे.
वाहनधारकांची मागणी – “तत्काळ केंद्रे वाढवा!”
“वारंवार फेऱ्या मारून थकलोय!” “वेबसाइट व्यवस्थित चालत नाही, नंबर प्लेटसाठी किती दिवस वाट पाहायची?” “परिवहन विभागाने वेळेत नियोजन करायला हवे होते, आमच्या वेळेचा आणि पैशांचा अपव्यय होतोय!”
अशा प्रतिक्रिया वाहनधारकांकडून मिळत आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने अधिक केंद्रे सुरू करण्याची गरज आहे.