Home Breaking News रामटेक येथे पंकजाताई मुंडे यांची सदिच्छा भेट; महिला सक्षमीकरण, स्वावलंबन व POSH...

रामटेक येथे पंकजाताई मुंडे यांची सदिच्छा भेट; महिला सक्षमीकरण, स्वावलंबन व POSH कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर सखोल चर्चा

मुंबई (रामटेक) : राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा. ना. पंकजाताई मुंडे यांची आज ‘रामटेक’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या विविध योजना, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाचे धोरणात्मक निर्णय आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी यावर सविस्तर संवाद झाला.
बैठकीत ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वयंरोजगार, बचत गट, कौशल्य विकास प्रशिक्षण, लघुउद्योगांना प्रोत्साहन, महिला उद्योजकता आणि शासकीय अनुदान योजनांचा विस्तार यावर विशेष भर देण्यात आला. महिलांनी केवळ कुटुंबापुरते मर्यादित न राहता समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन नेतृत्व करावे, यासाठी शासनाकडून अधिक संधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.
कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, प्रतिषेध व निवारण अधिनियम (POSH कायदा) याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खासगी संस्थेमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समित्या सक्रिय करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. महिलांना त्यांच्या हक्कांबाबत कायदेशीर जागरूकता निर्माण करणे, तक्रारींवर तातडीने कारवाई करणे आणि सुरक्षित कामाचे वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.
पंकजाताई मुंडे यांनी महिलांच्या सुरक्षेला आणि सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा शासनाचा निर्धार व्यक्त करत, “महिला सबलीकरणाशिवाय राज्याचा विकास शक्य नाही. महिलांना शिक्षण, रोजगार, न्याय आणि सुरक्षा या चारही पातळ्यांवर बळकट करणे हे आमचे ध्येय आहे,” असे सांगितले.
ही भेट राज्यातील महिला कल्याण, स्वावलंबन आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने धोरणात्मक पावले उचलण्यासाठी महत्त्वाची ठरणार असून, लवकरच ठोस उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले. या चर्चेमुळे महिला सक्षमीकरणाच्या चळवळीला नवी गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.