Home Breaking News वाकड–किवळे मार्गावरील वाहतूक कोंडीवर तोडगा काढा; सर्विस रोड व ६ नवीन ग्रेड...

वाकड–किवळे मार्गावरील वाहतूक कोंडीवर तोडगा काढा; सर्विस रोड व ६ नवीन ग्रेड सेपरेटरसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडे तातडीची मागणी

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वाकड ते किवळे या महत्त्वाच्या मार्गावर दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी लक्षात घेता स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या मार्गावर सुरू असलेल्या सर्विस रोड व ग्रेड सेपरेटरच्या कामांना गती देत नागरिकांना तातडीने दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष रामभाऊ वाकडकर व नगरसेविका श्रुती राम वाकडकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. वाढती लोकसंख्या, नव्या गृहप्रकल्पांची वाढ आणि आयटी पार्क तसेच औद्योगिक वसाहतींमुळे या मार्गावरील वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला आहे. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहनांच्या लांबलचक रांगा लागत असून नागरिकांना तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावे लागत आहे.
निवेदनामध्ये भूमकर वस्ती येथील रस्त्याची रुंदी आणि प्रस्तावित ग्रेड सेपरेटरची रुंदी समान ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून ‘बॉटलनेक’ तयार होणार नाही. तसेच ताथवडे व पुनावळे येथील विद्यमान ग्रेड सेपरेटर अपुरे ठरत असल्याने त्यांचे विस्तारीकरण करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय भविष्यातील वाहतूक भार लक्षात घेऊन पवना नदी ते पुनावळे, पुनावळे ते ताथवडे, ताथवडे ते वाकड आणि वाकड परिसरात एकूण सहा नवीन ग्रेड सेपरेटर उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे वाहतूक सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
पादचाऱ्यांच्या सुरक्षेलाही विशेष महत्त्व देत पादचारी पूल, अंडरपास किंवा सिग्नलयुक्त क्रॉसिंगची व्यवस्था उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी सुरक्षित प्रवास अत्यावश्यक असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
राम वाकडकर म्हणाले, “वाकड–किवळे मार्गावरील वाहतूक कोंडी ही आता नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील मोठी समस्या बनली आहे. कामांना अपेक्षित गती मिळाली नाही तर परिस्थिती आणखी बिकट होईल. ६ नवीन ग्रेड सेपरेटर उभारणे ही गरज असून प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा.”
स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडूनही या मागण्यांना पाठिंबा मिळत असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी अशी सर्वांची अपेक्षा आहे.