पुणे : ऑनलाईन मॅट्रिमोनिअल संकेतस्थळांवर जोडपे जुळवले जात असताना, काहीजण मात्र याचा गैरफायदा घेत आहेत. अशाच एका घटनेत पुण्यातील २९ वर्षीय आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुणीला एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तब्बल ३५ लाख २५ हजार रुपयांना गंडवले. या प्रकारामुळे अनेक तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बाणेर पोलिसांनी या प्रकरणात मुंबईतील चेंबूर येथून आरोपी साईश विनोद जाधव (वय २५) याला अटक केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नाच्या नावाखाली विश्वासघात
तक्रारदार तरुणी ही बालेवाडी हायस्ट्रीट परिसरातील एका आयटी कंपनीत नोकरी करते आणि बाणेरमध्ये एका वसतिगृहात राहते. तिनेविवाह जुळवणाऱ्या नामांकित संकेतस्थळावर नोंदणीकेली होती. त्यावर आरोपीने तिला संपर्क केला आणि आपण विवाह इच्छुक असल्याचे सांगितले. ओळख वाढल्यानंतर तो तिला भेटण्यासाठी पुण्यातही आला. दोघांनी एका रेस्टॉरंटमध्ये भेट घेतली आणि पुढील काही दिवसांमध्ये त्यांचे नाते दृढ झाले.
भावनिक आणि आर्थिक फसवणूक
आरोपीने आई-वडील वारले असल्याचे आणि भाऊ दुबईत नोकरी करत असल्याचे खोटे सांगून तिला विश्वासात घेतले. हळूहळू त्याने तिच्या सहानुभूतीचा गैरफायदा घेत आर्थिक मदतीची मागणी सुरू केली. तो मित्राने आर्थिक फसवणूक केल्याचे, तुरुंगात जावे लागू शकते असे सांगून तिला भावनिकदृष्ट्या कमकुवत करत गंडवत राहिला. इतकेच नाही, तर मोबाईल बिघडल्याचे सांगून तिला महागडा स्मार्टफोनही खरेदी करायला लावला.
३५ लाखांचा गंडा!
तरुणीने सुरुवातीला स्वतःच्या पैशांतून मदत केली. मात्र, आरोपीची मागणी वाढत गेली. अखेर तिने कंपनीकडून आणि खासगी वित्तपुरवठा कंपनीकडून कर्ज घेत त्याला मदत केली. जवळपास दीड ते पावणेदोन वर्षांत आरोपीने तिच्याकडून ३५ लाख २५ हजार रुपये लाटले.
लग्नाबाबत विचारल्यावर उडवाउडवी
तरुणीने अनेकदा लग्नाबद्दल विचारणा केली असता, आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यामुळे संशय आल्याने तिने त्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले आणि अखेर बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करून आरोपीला मुंबईतील चेंबूर येथून अटक केली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सहायक निरीक्षक अनिल केकाण करत आहेत.
मॅट्रिमोनिअल साईटवर सतर्क राहा!
अनेक वेळा मॅट्रिमोनिअल साईटवर ओळख झाल्यानंतर फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे ऑनलाईन विवाह संकेतस्थळांवरून जोडीदार शोधत असताना सर्व माहिती पडताळून पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ओळखीच्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवण्याआधी त्याच्या पार्श्वभूमीची खात्री करणे गरजेचे आहे, अन्यथा अशा प्रकारे आर्थिक आणि भावनिक फसवणुकीचे बळी ठरण्याचा धोका वाढतो.
महत्वाच्या गोष्टी: ऑनलाईन लग्न जुळवताना काळजी घ्या! भावनिक फसवणूक टाळण्यासाठी जोडीदाराची पार्श्वभूमी तपासा. कोणालाही मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत करताना योग्य पडताळणी करा. संशयास्पद वर्तन दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्या.