नाशिक : मालेगावमधील इस्लामाबाद भागात बुधवारी पहाटे २.३० च्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने घरात घुसून १८ वर्षीय युवतीवर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात युवतीचे आई-वडीलही जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार, ही युवती महाविद्यालयीन शिक्षण घेत असून, पहाटेच्या वेळी घरात झोपलेले असताना अनोळखी हल्लेखोराने हायड्रोक्लोरिक अॅसिड फेकले. प्रथम युवतीवर अॅसिड हल्ला केला गेला आणि त्यानंतर तिच्या आई-वडिलांवरही हल्लेखोराने अॅसिड फेकून पळ काढला. या हल्ल्यामुळे सर्वांच्या शरीरावर गंभीर दुखापती झाल्या आहेत.
पोलिसांनी सांगितले की, अद्याप हल्लेखोराची ओळख पटलेली नाही तसेच हल्ल्याचे कारणही अस्पष्ट आहे. पीडित युवतीचा जबाब अद्याप नोंदवला गेला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
या घटनेबाबत मालेगाव किल्ला पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२४(१) (अॅसिड वापरून गंभीर दुखापत करणे) आणि ३३३ (हल्ला करण्यासाठी घरात घुसणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.