पुणे: शहरातील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, सिंहगड रस्त्यावर आज (दि.४) सकाळी एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामागे पूर्ववैमनस्य आणि खुनाचा बदला असल्याचे समजते.
सागर चव्हाण (जखमी तरुण) याच्यावर हा हल्ला करण्यात आला. किरकटवाडी भागातील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. सागर याचा मे महिन्यातील डहाणूकर कॉलनीत झालेल्या खुनाच्या घटनेशी संबंध आहे. त्यावेळी श्रीनिवास वतसलवार याची हत्या करण्यात आली होती, आणि सागर हा त्या घटनेत सहभागी होता.
आरोपींनी सागरला फसवण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एका मुलीच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार केले होते. या बनावट अकाउंटवरून सागरसोबत रोज संवाद साधण्यात आला. सागरला हे अकाउंट चालवणाऱ्या व्यक्तींची कोणतीही कल्पना नव्हती आणि त्याने त्या मुलीवर विश्वास ठेवला व तिच्या प्रेमात पडला. महिनाभराच्या संवादानंतर सागरला आज प्रत्यक्ष भेटण्यासाठी बोलावले गेले.
सकाळी सागर सिंहगड रोडवर भेटायला आला असता त्याच्यावर कोयत्याने जबरदस्त हल्ला करण्यात आला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या काटेकोर प्लॅनमुळे पुण्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांकडे लक्ष वेधले गेले आहे.