पुणे: मुंबई-पुणे महामार्गावर खडकी रेल्वे स्थानकाजवळ रविवारी (दि. २५) भीषण अपघातात भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी मनीषा विजयसिंह भोसले (वय ४०, रा. कवठे महांकाळ, सांगली) यांचा मृत्यू झाला. भरधाव एसटी बसने त्यांच्या कारला जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात घडला.
खडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा भोसले यांची नुकतीच पुरंदर तालुक्यात बदली झाली होती. त्या पिंपरीतील चिखली येथे आपल्या भावाकडे आल्या होत्या. रविवारी सकाळी हडपसरकडे जाण्याच्या तयारीत असताना, एसटी बसने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली, ज्यामुळे कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर, एसटी बसचे नियंत्रण सुटले आणि बसने आणखी एका मोटारीला व दुचाकीस्वाराला धडक दिली, ज्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.
रहिवासी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मोटारीत अडकलेल्या तिघांना बाहेर काढून तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने, मनीषा भोसले यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या अपघातात भोसले यांचे पती व भाऊ गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातात १२ प्रवासीही जखमी झाले असून, त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस आणि कारचे मोठे नुकसान झाले आहे.