पुणे: हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात रविवारी दुपारी एक अत्यंत गंभीर घटना घडली. दोन दुचाकीस्वारांमध्ये सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान, आरोपींनी सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयत्याने हल्ला केला आणि घटनास्थळावरून फरार झाले.
आरोपी निहालसिंग मन्नूसिंग टाक (वय १९, तुळजाभवानी वसाहत, हडपसर), राहुलसिंग उर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड (वय २०, हडपसर), आणि अमरसिंग जग्गरसिंग टाक (वय २३) यांना सोलापूर परिसरातून अटक करण्यात आली आहे.
रविवारी दुपारी चार वाजता, ससाणेनगर परिसरात दोन दुचाकीस्वारांमध्ये वाद सुरू झाला होता. आरोपी निहालसिंग आणि राहुलसिंग यांच्याजवळ कोयता होता आणि त्यांनी वादात हस्तक्षेप करणाऱ्या गायकवाड यांच्यावर हल्ला केला. गायकवाड यांनी आरोपींचा कोयता काढण्याचा प्रयत्न केला असता, निहालसिंगने त्यांना गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
पोलीस उपायुक्त आर. राजा आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या निर्देशित केले. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आरोपींना पकडून पुण्याच्या गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या ताब्यात दिले आहे.