मंगळवारी दुपारी १ वाजता कोथरूड येथील महार्षी कर्वे पुतळा चौकात असलेल्या ‘लोढा पेट्रोल पंप’वर स्फोट झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. या स्फोटामुळे पंपावर असलेल्या वाहनधारकांमध्ये घाईगडबड उडाली. पंप कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने संभाव्य अनर्थ टळला. दरम्यान, अग्निशामक दल आणि कोथरूड पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनद्वारे चालवल्या जाणाऱ्या या पेट्रोल पंपावर स्फोटाच्या वेळी एका टँकरद्वारे पेट्रोलचा पुरवठा चालू होता. भूमिगत पेट्रोल टाकीचे झाकण फटाक्यांच्या आवाजासारख्या मोठ्या आवाजाने उडाले आणि तो आवाज संपूर्ण परिसरात घुमला. प्राथमिक चौकशीत असे दिसून आले की भूमिगत टाकीत गॅस दाब वाढल्यामुळे हा स्फोट झाला.
पंप कर्मचाऱ्यांनी तत्काळ पेट्रोलने भरलेला टँकर बाजूला काढला आणि वाहनधारकांना सुरक्षित बाहेर काढले. स्फोटाची बातमी लगेच पसरली आणि पेट्रोल पंपावर बघ्यांची गर्दी झाली. कोथरूड अग्निशामक दलाचे जवान, पोलीस अधिकारी आणि कोथरूड पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदेश देशमाने यांनी सांगितले की, “भूमिगत पेट्रोल टाकीत हवा अडकली होती, ज्यामुळे झाकण उडाले आणि मोठा आवाज झाला. प्रत्यक्षात स्फोट झाला नाही आणि परिस्थिती नियंत्रणात आहे.”