पुणे शहरातील विमानगर येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत राजस्थानी अभिनेत्रीसह उझबेकिस्तानमधील दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले.
याप्रकरणी दलाल इरफान उर्फ राहुल मदन उर्फ मदन सन्यासी व रोहित यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये विमाननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानगर भागातील एका हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. आरोपी इराफान आणि रोहित परराज्यातील आहे. ते ऑनलाइन पद्धतीने वेश्याव्यवसाय चालवित होते.
याबाबतची गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. व पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीन खातरजमा केली. निको गार्डन रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. हॉटेलमधील दोन खोल्यांमधून उझबेकिस्तान आणि राजस्थान येथील तीन तरुणींना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणींपैकी एक तरुणी राजस्थानी अभिनेत्री असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.दलालांनी कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये रुम आरक्षित करून तरुणींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे उघड झाले आहे. पुणे शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, राजेश माळेगावे, उपनिरीक्षक आश्विनी भोसले, सागर केकाण, मनिषा पुकाळे, अजय राणे , संदीप कोळगे, बाबा करपे, रेश्मा कंक, राजेंद्र कुमावत यांच्या पथकाने केली आहे.