पुणे :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन हायअलर्टवर आहे. त्याच पार्श्वभूमीवर युनिट २ गुन्हे शाखेने धाडस दाखवत मुंढवा परिसरात दरोड्याचा कट उधळून तीन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले.
२५ ऑगस्ट रोजी रात्री गुन्हे शाखा युनिट २ चे पथक भापकर पेट्रोल पंपाजवळील भुयारी मार्गावर पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमलदार शंकर नेवसे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही सराईत गुन्हेगार तेथे गर्दीचा फायदा घेऊन लूटमार करण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आणि तत्काळ छापा टाकण्यात आला.
या कारवाईत पोलिसांनी करण हरिदास जाधव (२४), रवि यल्लप्पा गायकवाड (४२) व जयश परशुराम गायकवाड (२७) या तिन्ही आरोपींना रंगेहाथ पकडले. आरोपींकडून घातक शस्त्रे, हॅण्डग्लोज व कटवाणी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्यासोबत असलेल्या आणखी दोन आरोपींवरही कारवाई सुरू आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी सदर आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांचे गुन्हे दाखल असून, ते विशेषतः बसमधील गर्दीत किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांची लूटमार करणारे सराईत गुन्हेगार म्हणून ओळखले जातात.
मुंढवा पोलीस ठाण्यातील गुन्हा क्र. ३४८/१९ – भा.द.वि. कलम ४५२, ३५४ तसेच पोस्को कलम ७ व ८
यावरून हे स्पष्ट होते की, आरोपी हे सतत गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय राहिले आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. युनिट २ चे प्रभारी पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या नेतृत्वाखालील पथकात अमोल रसाळ, आशिष कवठेकर, संजय जाधव, शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, विजयकुमार पवार, शंकर कुंभार, संजय आबनावे, विनायक वगारे, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, राहुल शिंदे, विनोद चव्हाण, ओमकार कुंभार आदी अधिकाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली.
महत्त्वाचे : गणेशोत्सव काळात पुणे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहावे, कोणताही संशयास्पद प्रकार दिसल्यास तात्काळ पोलीस हेल्पलाईनवर कळवावे. पोलिसांचे सततचे पेट्रोलिंग आणि तत्पर कारवाईमुळे नागरिकांना सुरक्षिततेचा दिलासा मिळत आहे.