पुणे : पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि महत्वाचा सण मानला जातो. यावर्षी २७ ऑगस्ट २०२५ ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत शहरभरात विविध गणेश मंडळांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर गर्दी व्यवस्थापन, आपत्ती नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी पुणे शहरातील पोलीस अधिकारी, अंमलदार, स्वयंसेवक व गणेश मंडळांचे कार्यकर्ते यांच्यासाठी एक विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले.
शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशाने दिनांक २३/०८/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता वानवडी येथील जांभूळकर गार्डनमध्ये हे प्रशिक्षण घेण्यात आले. या शिबिराचे आयोजन परिमंडळ ५ चे वरिष्ठ पोलीस अधिकारी व त्यांचे सहकारी यांनी केले होते.
शिबिरामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून ‘रिसिलिअंट इंडिया’, नाशिक येथील प्रशिक्षणतज्ज्ञ श्री. राजीव बोंबे यांची उपस्थिती होती. त्यांनी आपत्ती व्यवस्थापनातील अत्यंत महत्वाच्या बाबी उलगडून सांगितल्या. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे होणाऱ्या गर्दीचे नियंत्रण तसेच नाशिकच्या कुंभमेळ्यातील अनुभवाच्या आधारे त्यांनी गर्दी नियंत्रकांसाठी विविध युक्त्या व उपाय सांगितले.
या शिबिरात सुमारे १०० पोलीस अधिकारी, ५०० पोलीस अंमलदार, ४०० स्वयंसेवक व गणेश मंडळांचे प्रतिनिधी सहभागी झाले.
त्यांना परिस्थिती नियंत्रण, आपत्तीजन्य प्रसंगी योग्य निर्णय घेणे, नागरिकांना सुरक्षित मार्ग दाखवणे, तसेच अफवांपासून सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
परिमंडळ ५ चे उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सर्व सहभागींचे मन:पूर्वक अभिनंदन करताना पुढील सूचना दिल्या: “कोणत्याही स्वरूपाची आपत्ती किंवा अडचण उद्भवल्यास, नागरिकांनी गोंधळ न करता पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. गर्दीमुळे काही दुर्घटना होऊ नयेत यासाठी प्रत्येक स्वयंसेवकाने दक्ष राहावे. पोलिस आणि स्वयंसेवक यांचा योग्य समन्वय राखून शांततेत आणि सुरक्षिततेत गणेशोत्सव साजरा करण्यात यावा.”
गर्दी नियंत्रणासाठी सज्ज पुणे पोलीस – गणेश मंडळांनाही मार्गदर्शन गणेश मंडळांना सूचना देण्यात आल्या की त्यांच्या मंडपाजवळ प्रशिक्षित स्वयंसेवक असावेत, पोलिसांना सहकार्य करावे व आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक नागरिकांना तत्काळ मदत करावी.
नागरिकांनाही आवाहन: गणेशोत्सव साजरा करताना पोलिस प्रशासन आणि स्वयंसेवकांच्या सूचना पाळा. कुठेही गोंधळ किंवा अफवा पसरवू नका. शिस्त, संयम व सहकार्य हाच गणेशभक्तीचा खरा संदेश आहे.