Home Breaking News पोलिस आयुक्तांचे नाव घेऊन खंडणी मागणाऱ्यांचा भंडाफोड – पत्रकार जितीन शेट्टीसह अन्य...

पोलिस आयुक्तांचे नाव घेऊन खंडणी मागणाऱ्यांचा भंडाफोड – पत्रकार जितीन शेट्टीसह अन्य आरोपी रंगेहाथ अटक

106
0
पुणे : शहरातील व्यावसायिकांकडून खंडणी उकळण्याचे धाडस काही पत्रकारांनीच केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलिस आयुक्तांचे नाव वापरून दबाव टाकत लाखो रुपयांची मागणी करणाऱ्या जितीन शेट्टीसह अन्य पत्रकारांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर व्यावसायिक समाजात दिलासा तर माध्यम क्षेत्रात धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पत्रकारांनी व्यावसायिकांना “पोलीस आयुक्त तुमच्यावर कारवाई करणार आहेत, पण आमच्याशी सेटलमेंट केल्यास प्रश्न सुटेल” असे सांगून धमकी दिली. या प्रकरणात पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने सापळा रचून आरोपींना खंडणी घेताना पकडले. या कारवाईत अनेक पुरावे जप्त करण्यात आले असून आरोपींच्या मोबाईल, संभाषणाचे रेकॉर्डिंग व रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
 पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे की, या रॅकेटमागे एक संघटित टोळी कार्यरत होती. त्यांनी गेल्या काही महिन्यांत अनेक व्यवसायिकांना लक्ष्य केले होते. या प्रकरणात आणखी किती जण सहभागी आहेत, याचा तपास सुरू आहे. आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील चौकशीसाठी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
या घटनेमुळे पत्रकारिता या पवित्र व्यवसायावर काळी छाया पडल्याची भावना व्यक्त होत आहे. खरी पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान कमी करण्याचे काम काही लोभी लोक करीत असल्याबद्दल समाजमनातून संताप व्यक्त होत आहे.
 पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की, “कोणत्याही व्यक्तीने पोलिसांचे नाव घेऊन धमक्या दिल्या किंवा खंडणी मागितली, तर अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल.”
 या घटनेमुळे व्यावसायिक, व्यापारी व समाजातील नागरिकांना एक मोठा संदेश मिळाला आहे – पोलिसांवर विश्वास ठेवा आणि अशा रॅकेटला बळी पडू नका.
“पोलिस आयुक्तांचे नाव घेऊन खंडणी मागणाऱ्या पत्रकारांचे रॅकेट उघडकीस – जितीन शेट्टीसह अन्य आरोपी अटक”