हिंजवडी परिसराचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC) समावेश व्हावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या ऑनलाईन सह्यांची मोहीम आता अधिक जोमाने पुढे जात आहे. आयटी हब असलेल्या या भागातील नागरिक, आयटी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, तसेच सामाजिक संघटना यांच्यातून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच, आता या मागणीला राजकीय पातळीवर मोठा पाठिंबा मिळाला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी या मोहिमेला ठाम पाठिंबा दिला असून, “हिंजवडीतील जनतेच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.
आयटी पार्क आणि मोठ्या प्रमाणात वस्ती वाढत असतानाही, या भागातील नागरी सुविधा अत्यंत तुटपुंज्या आहेत. अपूर्ण रस्ते, पाण्याची अनियमितता, वाहतुकीची कोंडी, अपुरा कचरा व्यवस्थापन आणि अर्धवट विकासकामे यामुळे नागरिकांना आणि आयटीयन्सना रोजच्या जीवनात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर वाकड-पिंपरी चिंचवड रहिवासी विकास व कल्याण संस्था (WPRDWA) चे अध्यक्ष सचिन लोंढे यांच्या नेतृत्वात #UNCLOGHinjawadiITPark ही ऑनलाईन सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला हजारो नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. विशेष म्हणजे, ही मोहीम केवळ सामाजिक व्यासपीठापुरती मर्यादित न राहता आता राजकीय व प्रशासनिक वर्तुळातही गंभीरपणे घेतली जात आहे.
आमदार शंकर जगताप यांनी म्हटले की, “हिंजवडी परिसरातील नागरिकांच्या समस्या मी स्वतः पाहिल्या आहेत. या भागात महापालिकेचा समावेश झाल्यासच दीर्घकालीन व शाश्वत उपाय शक्य होतील. मी हा विषय विधानसभेपासून नगरविकास विभागापर्यंत पोहोचवणार असून, यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहे.”
या मोहिमेला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि आता मिळालेला राजकीय आधार पाहता, नागरिकांची ही दीर्घकालीन मागणी आता अधिक प्रभावी होणार हे स्पष्ट आहे. लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास विभागाकडे या संदर्भात निवेदन सादर करण्यात येणार असून, त्यानंतर निर्णय प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
हिंजवडीसारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आयटी हब जर महापालिकेच्या कार्यक्षेत्रात आला, तर रस्ते, पाणी, वीज, वाहतूक आणि सुरक्षा या सर्वच बाबतीत सकारात्मक परिवर्तन घडून येऊ शकते. त्यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल आणि उद्योगधंद्यांनाही गती मिळेल. नागरिकांच्या आवाजाला राजकीय वजन; आता सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जाण्याची अपेक्षा!