Home Breaking News माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजितदादांचा निळकंठेश्वर पॅनल विजयी! 21 पैकी 20 जागांवर...

माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजितदादांचा निळकंठेश्वर पॅनल विजयी! 21 पैकी 20 जागांवर दणदणीत यश; युवा नेते यश साने व पंकज भालेकर यांची अभिनंदन भेट

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बहुचर्चित आणि राज्याचे लक्ष वेधून घेणारा निकाल अखेर जाहीर झाला असून, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलने तब्बल 21 पैकी 20 जागा जिंकत प्रचंड दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालामुळे अजित पवारांचे सहकार क्षेत्रातील वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले असून, विरोधी शरद पवार यांच्या बळीराजा पॅनलला एकही जागा मिळवता आली नाही.

या विजयामुळे संपूर्ण बारामती परिसरात आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सहकार क्षेत्रातील ही निवडणूक राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात होती, कारण ती थेट अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच बघितली जात होती.

या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथे पिंपरी चिंचवड शहरातील युवा नेते यश दत्ताकाका साने आणि माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, “ही केवळ निवडणूक नव्हती, तर सहकाराच्या विकासासाठी अजितदादांनी घेतलेली मेहनत, त्यांची दूरदृष्टी आणि नेतृत्व याचा हा विजय आहे.”

या भेटीत यश साने आणि पंकज भालेकर यांनी अजित पवार यांच्यासोबत आगामी सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकासाच्या संधींवरही चर्चा केली. यावेळी अजितदादांनीही दोघांचं कौतुक करत त्यांना समाजकार्य आणि युवा नेतृत्वासाठी शुभेच्छा दिल्या.

या निवडणुकीतील विजयामुळे अजित पवार यांचं सहकार क्षेत्रातील वजन आणखी वाढले असून, आगामी काळात राज्यातील इतर सहकारी संस्थांवरही त्यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी वर्गात अजित पवार यांच्याविषयी असलेल्या विश्वासाचे हे फलित आहे, असे अनेक राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. निळकंठेश्वर पॅनलचा हा दणदणीत विजय म्हणजे सहकार क्षेत्रातील नेतृत्वाचं बळ आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा विजय!