पुणे: हडपसरच्या रामटेकडी परिसरातील सुरेशनगर आणि जुनी म्हाडा कॉलनीजवळ असलेल्या प्लास्टिक स्क्रॅप गोडाऊनला शनिवारी भीषण आग लागली. अंदाजे १५ गुंठे क्षेत्रफळावर फैलावलेल्या या आगीवर अग्निशमन दलाच्या वेळीच केलेल्या प्रयत्नांमुळे नियंत्रण मिळवता आले.
हडपसरच्या कालाभाई बोराटे नगर आणि बीटी कावडे येथील अग्निशमन केंद्रांमधून अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून आगीचा फटका आजूबाजूच्या म्हाडा कॉलनी आणि इतर वसाहतींना बसला नाही, असे अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनवणे यांनी सांगितले.
आग मोठ्या प्रमाणात फैलावली असली तरीही, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा साठा असल्याने आग झपाट्याने पसरली होती.
स्थलिक रहिवाशांनी सुरक्षेच्या दृष्टीने गोडाऊनच्या जवळपासच्या परिसरातील नागरिकांना बाहेर काढण्यात मदत केली. अग्निशमन दलाने वेळीच उपाययोजना केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.